नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप..
रेझिंग डे निमित्त वेगळा उपक्रम
कर्जत,दि. 9 गणेश पवार
पोलीस दलाकडून पोलीस खात्याची माहिती देणारा रेझिंग डे सप्ताह सध्या सुरू असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लॅंकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले.नेरळ पोलीस दलाकडून रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना हत्यारांची हाताळणी आणि पोलिसांच्या कामाची माहिती देण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.
नेरळ पोलीसांकडून रेझिंग डे निमित्ताने माणगाववाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर बोलत होते.त्यावेळी त्यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पोलीस काका,पोलीस दीदी आणि शाळांमध्ये लावलेल्या पत्रपेटी या उपक्रमाचे कौतुक केले.त्याचवेळी नेरळ पोलीस ठाण्याकडून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना सध्याच्या थंडीच्या वातावरणात गरम कपड्यांची ऊब मिळावी म्हणून ब्लॅंकेट देण्यात येत आहेत. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून अनेक शाळांमध्ये असे उपक्रम राबविले जात असल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे कौतुक करायला पाहिजे.त्यावेळी उपस्थित असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव गायकवाड यांनी आमच्या कडे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करायला अनेक शाळा येतात,मात्र पोलीस दलातील अधिकारी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ब्लॅंकेट वाटप करते ही बाब इतर दात्यांपेक्षा अत्यन्त वेगळी अशीच आहे.त्यामुळे अधिकारी आणि पोलीस यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहेत असे देखील स्पष्ठ केले.
नेरळ पोलीस ठाण्याकडून नेरळ विद्या मंदिर शाळेतील 900 विद्यार्थ्यांना रेझिंग डे निमित्त पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.त्यात शस्त्र कशी असतात,शस्त्रांची हाताळणी कशी करावी याबरोबर पोलीस दल कायदा आणि सुव्यवस्था राखताना कशी कामगिरी बजावते यावर पोलीस अधिकारी अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यावेळी नेरळ विद्या मंदिर मधील गरीब मुलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.महाराष्ट्र पोलीस दलाच्या या रेझिंग डे सप्ताह निमित्त नेरळ पोलीस ठाण्यात कन्या शाळा,विद्या विकास शाळा येथील विद्यार्थी यांनी येऊन कामकाज पाहिले आणि तेथील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद देखील साधला.त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी पोलीस अधिकारी अविनाश पाटील,पोलीस उपनिरीक्षक भालचिम,शिद यांनी तसेच पोलीस कर्मचारी यांनी माहिती दिली.
फोटो ओळ
नेरळ पोलीस ठाण्यातील रेझिंग डे
छाय ः गणेश पवार