शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर* *- उद्योग मंत्री सुभाष देसाई*

*शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर*


*- उद्योग मंत्री सुभाष देसाई*


  पुणे,दि.१८: शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.


   प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत आज उद्योग मंत्री श्री. देसाई यांनी संवाद साधला. यावेळी उद्योग विभागाचे पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पुणे, नाशिक, सांगली, लातूर येथील 35 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.  


   उद्योग मंत्री श्री. देसाई यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व राज्य शासनाकडून आवश्यक असणाऱ्या सहकार्याबद्दल जाणून घेतले. श्री.देसाई म्हणाले, शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरु आहे. शेतमालावरील प्रक्रिया उद्योगावर भर देवून मूल्यवाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून या निधीचा अधिकाधिक उपयोग शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करुन घ्यायला हवा. शेतीच्या पद्धतीत बदलासाठी शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली असून गट शेतीवर भर द्यायला हवा. तथापी शेतीपूरक उद्योगांना आवश्यक कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांनी मानसिकता बदलायला हवी.
   श्री.देसाई म्हणाले, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच लघुउद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाचा उद्योग विभाग कार्यरत आहे. लघुउद्योगांच्या अडचणी दूर करून ते पुनरुज्जीवित करण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी उत्पादक कंपन्यांना औद्योगिक पाठबळ मिळवून देण्यासाठी राज्य शासन धोरण राबवत आहे. यात शेतीपूरक लघुउद्योगांना शासनाच्या वतीने अनुदान देण्याबरोबरच बँकांनी विना अडथळे कर्ज देण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. उद्योग उभारणीसाठी एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध करून दिली जात असून याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी करुन घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.  


  कार्यक्रमात सदाशिव सुरवसे यांनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती' कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ग्रामीण भागातील लघू उद्योगांना चालना देण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास एपी ग्लोबाले चे उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, सिमॅसिस लर्निंग एलएलपी चे सह सरव्यवस्थापक अमोल बिरारी, पॅलॅडियम कन्सल्टींग इंडिया कंपनीच्या सल्लागार विभागाचे प्रमुख अमित पटजोशी, महा एफपीसी चे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर चे माजी अध्यक्ष आशिष गर्दे उपस्थित होते. अमोल बिरारी यांनी कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाचे सादरीकरण केले. अमित जोशी, योगेश थोरात, आशिष गर्दे तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
00000000