विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
पुणे दि 1 :- कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अभिवादन केले.
यावेळी आ. अशोक पवार, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
 अभिवादनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. आज देखील पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. राज्यभरातून नागरिक  या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात, शूर-वीरांची आठवण ठेवण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी विजयस्तंभास अभिवादन करण्याठी यावे. कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण, जातीय सलोखा कायम राखत, आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपण जतन केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
*****