तान्हाजी झंझावात मराठ्यांचा! 🚩🚩🚩🚩 ओम राऊत यांनी दिग्दर्शन केलेला 'तान्हाजी' हा चित्रपट खरोखर एक अप्रतिम ऐतिहासिक काळातली

#तान्हाजी झंझावात मराठ्यांचा! 🚩🚩🚩🚩


ओम राऊत यांनी दिग्दर्शन केलेला 'तान्हाजी' हा चित्रपट खरोखर एक अप्रतिम ऐतिहासिक काळातली आणि जाज्वल्य अस्मिता असणारी गोष्ट कशी सांगावा याचा अप्रतिम नमुना आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची रोचक कथा माहिती नसणारा मराठी माणूस विरळा. महाराष्ट्राचं आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांना 'आधी लगीन कोंढण्याचं, मग माझ्या रायबाचं' असं वचन देऊन आपल्या प्राणांची आहुती देऊन कोंढाणा सर केलेल्या सुभेदार तान्हाजींना साश्रु नयनांनी निरोप देताना महाराज म्हणाले होते, "गड आला पण सिंह गेला!" 


अशी ही मराठ्यांच्या या हृदयात असणारी शौर्यगाथा, राऊतांनी एका वेगवान, बंदिस्त आणि तुफानी संवादांची रेलचेल असलेल्या गोळीबंद पटकथेतून सादर केलीय. सुरुवातीपासून 'तान्हाजी' प्रेक्षकांना जो शिवकाळात नेतो तो प्रभाव थेटरबाहेर आल्यानंतरही कायम राहतो. अर्थात सिनेमात अतिशयोक्ती आहे. VFX आहेत. इतिहासात न ऐकलेले प्रसंग आहेत. नाट्यमयता तर ठायीठायी आहे पण कुठेही रसभंग न होता उलट प्रेक्षकांना स्फुरण येत राहील अशा dramatics सह तान्हाजी पुढे पुढे कूच करतो. तांत्रिक बाबतीत सिनेमा छानच आहे. विशेषतः लढाया आणि शेवटची कोंढाणा सर करतानाची आरपार घमासान ज्याला आपण हातघाईची लढाई म्हणतो तशी लढाई प्रेक्षकांना खुर्चीतून उसळायला लावते. सलाम या टीमला (सिनेमॅटोग्राफर, एडिटिंग, साहसदृश्य, vfx)...


सिनेमाचा वीररस मात्र सिनेमाचं पार्श्वसंगीत आणि गाणी कढत, रटरटत ठेवतात. 'मायभवानी', 'शंकरा रे शंकरा' (अजय-अतुल) आणि 'रा रा रा' (सचेत -परंपरा) ही तान्हाजीची थीम बेफाम आहे..


अभिनयात कास्टिंग इतकं सुंदर जमलंय. पिसाळ झालेले अजिंक्य देव, सूर्याजी बनलेले देवदत्त नागे,शेलारमामा बनलेले शशांक शेंडे फक्कड. पद्मावती राव यांच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ करारीच. नेहा शर्मा सुंदर. लूक केनीचा औरंगजेब सुद्धा जमलाय पण आपली सुरुवात आपल्या काजोल पासून. नखशिखांत मराठा सुभेदाराची कारभारीण दिसते आणि आबदार वावरते कजलो. नजर हटत नाही तिच्या ठसठशीत मऱ्हाटमोळ्या सौंदर्यावरून.... आणि शरद केळकरांनी उभे केलेले राजे! मुजरा... त्यांचं कणखर असणं, भावूक होणं, तान्या म्हणून कळवळणं... समोर कोंढाण्यावर धुमश्चक्री चालू असताना ते म्हणतात, "माझे अश्रू थांबत नाहीत, तान्याचं रक्त वाहत असणार." पुढच्या क्षणी ते महाद्वार उघडून कोंढाण्यावर चढाई करायला ताडताड चालत येतात... आक्ख थेटर उसळलं... साक्षात आमचा राजा तान्हाजीच्या मदतीला निघाला म्हणून...हे वातावरण, हा फील केळकरांच्या शिवछत्रपतींच्या सदारीकरणानेही आला.. केळकर जबराच!


सैफचा उदयभान बऱ्याच वेळेला रणवीरच्या खिलजीची आठवण करून देतो तरीही काही काही क्षण सैफने कमाल केलीय. मुळात कोंढाणा जिंकण्यासाठी उदयभानला मारणं अशक्य वाटतं हे सैफच्या वावरामुळे विश्वसनीय झालेलं आहे. शेवटच्या निकराच्या युद्धात सैफचा उदयभान जबरदस्त आहे.


तान्हाजी मात्र सर्वथा अजय देवगण या माणसाचा आहे. वस्तुतः तान्हाजी मालुसरे म्हटलं की थोडा बलदंड माणूस नजरेसमोर येतो पण अजय सडपातळ असूनही तान्हाजीचं भारदस्त व्यक्तिमत्व, बालपणीचा सवंगडी शिवबाबद्दल असीम प्रेम आणि श्रद्धा, स्वराज्याचं स्वप्न आणि कुठल्याही मोहिमेला निधड्या छातीनं सामोरं जाण्याची तयारी असा हा ढाण्या वाघ म्हणजेच सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजेच अजय देवगण हे समीकरण अजयच्या कडक अभिनयाने सुरुवातीच्या काही दृश्यात दिग्दर्शक व अजय बिंबवण्यात कमालीचे यशस्वी झालेत. अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा क्लायमॅक्स झालाय. त्यात अजयची अदाकारी तुफानच...


तान्हाजी हा बाहुबलीसारख्या सिनेमापेक्षा पेक्षा दोन अंगुळे सरसच ... (vfx आणि साहसदृश्य लक्षात घेता) 


कदाचित माझ्यातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं लढाऊ रक्त पक्षपाती होत असेल.


Who cares!


तातडीने जवळच्या किंवा कुठल्याही चित्रपटगृहाकडे कूच करा...


सुभेदार कोंढाण्याच्या चढाईला निघालेत.


चार तोफांची सलामी 💥💥💥💥


#CinemaGully


#TanhajiTheUnsungWarrior #AjayDevgan #SaifAliKhan