पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड _________________________________

पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
_________________________________


अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालात हे उघड झाले आहे. चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. फूड सेफ्टी आणि स्टॅडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडीयाच्या (FSSAI) गाईडलाईननुसार रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.
येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले होते. येवले चहा प्यायल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांना भोवला असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. 
येवले चहामधे मेलामाईनचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरले होते. त्या पार्श्वभूमीवर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तसेच प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. यावर येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली होती.
'येवले अमृततुल्य'कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचं कुठलंही कृत्य केलं जात नाही. एफडीएच्या अधिकाऱ्यांना पॅकिंगसंदर्भात काही त्रुटी आढळून आल्या होत्या, त्याची पू्र्तता आम्ही केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या बातम्यामधील मजकूरप्रमाणे मेलामाईन नावाचा पदार्थ आढळून आला नाही, आम्ही तो वापरतही नाही. ग्राहकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार आम्हाला नाही, आमच्यावर तसे संस्कारही झालेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, आमच्या सर्व फ्रँचाईजी नेहमीप्रमाणे सुरूच राहतील, असं नवनाथ येवले यांनी म्हटलं होतं.