वाहतुकीचे नियम पाळून राज्यात आदर्श निर्माण करावा*               *खासदार सुप्रिया सुळे*

*वाहतुकीचे नियम पाळून राज्यात आदर्श निर्माण करावा*
              *खासदार सुप्रिया सुळे*
                                                                        
             पुणे दि. 17:  रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून वाहतुकीचे नियम पाळून पुणेकरांनी राज्यासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन खासदार तथा संसदीय जिल्हा रस्ता  सुरक्षा समितीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाला, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास  जिल्हाधिकारी तथा संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव नवल किशोर  राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, वाहतूक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस अधीक्षक संदिप पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या  सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दुचाकी रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गक्रमण करण्यात आले. यावेळी राज्य परिवहन महामंडळातील उत्कृष्ट महिला वाहन चालक व रस्ता सुरक्षा अभियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
 खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्याचे युग गतिमान असले तरीही  वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन सुरक्षितपणे व नियंत्रित वेगात चालवायला हवे. रस्त्यावर अपघात झाल्यावर जखमींना वेळेत मदत व उपचार न झाल्यामुळे आजवर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी समाजाने संवेदनशीलता व माणूसकी जपायला हवी. रस्त्यावर अपघातात जखमी झाल्याचे दिसून आल्यास प्रत्येकाने विनाविलंब अपघातग्रस्तांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे. 
 खासदार सुळे म्हणाल्या, हे शहर आपले असून शहराची  संस्कृती जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. वाहतुकीचे नियम स्वत: च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी असून वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पोलीस आपले कर्तव्य अविरत बजावत असल्याचे दिसून येते. वाहतूक शिस्तीचे नियम पोलीसांनी दाखवल्यास त्यांच्याशी आदराने व नम्रपणे संवाद साधून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करुन रस्ता सुरक्षा व पोलीसांप्रती आदरभावाचे धडे व संस्कार शाळांमधून द्यायला हवेत, असे त्यांनी सांगितले.


   *जिल्ह्यातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील*
     *जिल्हाधिकारी नवल किशोर राम*


जिल्हाधिकारी  श्री. राम म्हृणाले, कोणताही उपक्रम यशस्वी होण्यामध्ये महिला, युवक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्वाचा असतो. रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यासाठी युवा वर्गाने माहिती, शिक्षण व संवाद या माध्यमातून प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यातील वाहतूकीची समस्या दूर करण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. वाहतूक मार्गातील अडथळे, समस्या व तांत्रिक दोष दूर करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच अपघातानंतर जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करुन रस्ता रुंदीकरणावर भर देण्यात येत आहे, असे श्री. राम यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे व पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. रस्ते हे नागरिकांसाठी आहेत. या विचारातून रस्ते हॉकर मुक्त करुन ते नागरिकांसाठी मोकळे करण्यात येत आहेत. रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व वाहतूकीसाठी लागणारा वेळ कमी करुन सुरक्षित वाहतूकीला प्राधान्य देण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.  
     प्रास्ताविक अजित शिंदे  यांनी केले, तर आभार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले.
0000000


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image