कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस, रिसॉर्ट हाउसफुल्ल, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कर्जत तालुक्याला पसंती, पोलिसांचा चोख बंदोबस्त
कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस, रिसॉर्ट हाउसफुल्ल, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कर्जत तालुक्याला पसंती, पोलिसांचा चोख बंदोबस्त

 

कर्जत दि.30 गणेश पवार

 

              प्रदूषणमुक्त वातावरण, निस्सीम शांतता, आणि हिरवाईने बहरलेला निसर्ग यामुळे कर्जत तालुक्याला पर्यटकांची कायम पसंती असते. अशातच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कर्जत तालुक्यात दाखल झाले असून त्यामुळे तालुक्यातील फार्म हाऊस, रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला सरत्या वर्षाला निरोप देताना कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ याकरिता पोलीस देखील सज्ज झाले असल्याचे चित्र आहे. 

             पर्यटन हा विषय निघाला की मुंबई आणि पुणे यांच्या जवळचे पर्यटनस्थळ म्हणून कायम कर्जत तालुक्याला पर्यटकांची पसंती असते. याला कारण देखील तसेच आहे. तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण, बारमाही वाहणारी व मन उल्हसित करणारी उल्हास नदी, हिरवाईने बहरलेला परिसर, निस्सीम शांतता, यामुळे पर्यटकांना कर्जत तालुक्याची भुरळ पडते. त्यामुळेच येथील वातावरणात रममाण होण्यासाठी मुंबई, व मुंबईबाहेरील लोकांनी येथे जमिनी घेऊन त्यावर फार्म हाऊस उभे केले. एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यात त्यामुळे फार्म हाऊस संस्कृती उदयास आली. पुढे फार्म हाऊस, विकेंड होम यांची संख्या वाढू लागल्याने तालुक्याची ओळख ही फार्म हाउसचा तालुका अशी नवी ओळख कर्जत तालुक्याची प्रस्थापित झाली. तेव्हा सुट्टीच्या दिवसात येथील फार्म हाऊस हे फुललेले दिसतात. 

                  आज 31 डिसेंबर असल्याने सरत्या वर्षाला निरोप जल्लोषात निरोप देण्यासाठी येथील शेकडोंच्या वर संख्या असलेले फार्म हाऊस अक्षरश: फुल्ल झाले आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक तालुक्यात दाखल झाले असल्याचे चित्र आहे. खाजगी फार्म हाउस व्यतिरिक्त व्यावसायिक फार्म हाऊस, रिसॉर्ट, कृषी पर्यटन केंद्र आदी देखील पर्यटकांनी फुलले आहेत. नेरळजवळील सायली रिसॉर्ट, आनंदी रिसॉर्ट, 7 स्टार रिसॉर्ट, सीमा रिसॉर्ट, कृष्णाजी ऍग्रो रिसॉर्ट, सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्र, यांसह सर्व ठिकाण पर्यटकांनी फुलली आहेत तर  पर्यटकांची संख्या लक्षात घेता नवीन वर्षाच्या स्वागताला कोणतेही ग्रहण लागू नये या करिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्याकरिता कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 4 पोलीस अधिकारी, 55 पोलीस कर्मचारी, 13 होमगार्ड तर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत 3 पोलीस अधिकारी, 35 पोलीस कर्मचारी, 10 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यासह तालुक्यातील सर्व भागात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असणार आहे. 

 

 

 

फोटो ओळ 

नेरळ येथील आनंदी व सायली रिसॉर्ट येथे जमलेले पर्यटक

छाया ;  गणेश पवार