*पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित*
*विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते उद्घाटन*
पुणे, दि. २०: सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासनस्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' आज कार्यान्वित करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल उपायुक्त प्रताप जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे व अन्य अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर कक्ष स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली. विभागाचे महसूल उपायुक्त हे या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. नायब तहसीलदार आणि लिपिक यांची नियुक्ती देखील या कक्षासाठी करण्यात आली आहे. कक्षाचे कामकाज आजपासून सुरु करण्यात आले. जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षात स्विकारण्यात येणार असून संबंधितास त्याची पोचपावती देण्यात येईल. अर्जावर क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज, निवेदने विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. तसेच शासन स्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित अर्ज अथवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही व प्रलंबित अर्जांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे.
नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून लिहिलेले अर्ज किंवा निवेदने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या 'मुख्यमंत्री सचिवालय कक्षात' सादर करावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केले.
00000000000000