आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन

फोटो ओळ - पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने नितीन गोखले लिखित 'आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते आज शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी फोटोत (डावीकडून) नितीन गोखले, वप्पाला बालचंद्रन, लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे, जयंत उमराणीकर आणि प्रशांत गिरबने.    
सैन्य दल हे गुप्तचर विभागाचे ऋणी आहे - लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे


- 'आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकाचे प्रकाशन


पुणे, दि. २१ डिसेंबर, २०१९ : सैन्य दलाचे कोणतेही ऑपरेशन हे गुप्तहेर खात्याने पुरविलेल्या माहितीशिवाय, मदतीशिवाय पूर्ण होऊ शकलेले नाही. सैन्य दलाला हवी असलेली 'दुष्मन की खबर' ही नेहमीच गुप्तहेर खाते पुरवीत असते. रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसिस विंग अर्थात 'रॉ'  हे देखील अशाच खात्यांमधील एक आहे. गुप्तहेर विभागाच्या या सहकार्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी आहोत, असे प्रतिपादन सध्याचे भारतीय सैन्य दलाचे उपलष्करप्रमुख आणि १ जानेवारी पासून लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणारे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.


पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने नितीन गोखले लिखित 'आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते आज शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.


रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसिस विंग अर्थात 'रॉ'चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.        


यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, “गुप्तचर खाते म्हटल्यावर आपल्या समोर थेट जेम्स बॉण्ड येतो. इतकेच नाही तर गन्स, गिटार, ग्लॅमर म्हणजेच एखाद्या गुप्तहेराचे आयुष्य असा आपला समाज असतो. मात्र तो चुकीचा असून कधीही न पाहिलेले, ऐकलेले आणि नेहमीच पडद्यामागे राहणारे असे हे लोक असतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते करीत असलेली ही मदत सैन्य दलासाठी नेहमीच मोलाची ठरली आहे.”


नितीन गोखले लिखित 'आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकात गुप्तहेर खात्याच्या कामगिरीबरोबरच रिसर्च अॅण्ड अॅनॅलिसिस विंगचे पहिले प्रमुख आर. एन. काव यांच्या व्यक्तीमत्त्वावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. मुलाचे काश्मीर मधील काव यांची कारकीर्द या पुस्तकामध्ये वाचकांना अनुभवायला मिळेल. या वेळी नितीन गोखले यांनी वप्पाला बालचंद्रन यांच्याशी संवाद साधत आर. एन. काव यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या काही आठवणींना, कामगिरीला उजाळा दिला.


या वेळी बोलताना वप्पाला बालचंद्रन म्हणाले की, आज आपल्या देशात सैन्य दलाकडे व गुप्तहेर खात्याकडे असलेली माहितीची कागदपत्रे नागरिकांना वाचण्यासाठी उपलब्ध नाहित. सैन्य दल व गुप्तहेर खात्याकडील माहिती उघड करण्याची आज गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानशी संबंधित माहिती, बांग्लादेश निर्मिती वेळची कागदपत्रे व सुवर्ण मंदिरच्या वेळी करण्यात आलेल्या ऑपरेशन्सच्या कागदपत्रांचा समावेश असावा, यामुळे खरा इतिहास समोर येईल. युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता ही माहितीपत्रे उघड व्हायला हवी. त्यासाठी लोकशाहीमध्ये नवे कायदे करण्याची आज गरज आहे. वीस वर्षांनंतर ही कागपत्रे खुले करून त्याचा उपयोग होणार नाही तर पाच ते दहा वर्षांत ती खुली करण्यात यावीत.


आर. एन. काव हे स्वतः एक संस्था ते, ज्यांच्याकडे दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोनही गोष्टी होत्या. गुप्तचर विभागाच्या कामगिरीवर बोलताना नेहमीच त्यांची आठवण होईल कारण त्यांची निष्ठा ही त्यांच्या विचारांशी, देशाशी होती राजकारण्यांशी नव्हती असे मत  जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केले.