लता भगवान करे’चा प्रेरणादायी टीजर प्रदर्शित

लता भगवान करे'चा प्रेरणादायी टीजर प्रदर्शित''मी काल ही संघर्ष केला, आजही माझा संघर्ष सुरु आहे आणि पुढे ही माझ्या जीवनात  संघर्ष सुरु राहणार आहे. प्रयत्नांना वयाचे कोणतेही बंधन नसते यामुळे जिंकणे चिरतरुण आहे.'' असे सांगणाऱ्या 'लता भगवान करे - एक संघर्ष गाथा' या आगामी मराठी चित्रपटाचा प्रेरणादायी टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.


वयाच्या ६५ व्या नऊवारी साडीमध्ये धावत मॅरेथाॅन स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे यांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर हा चित्रपट भाष्य करतो. परमज्योती फिल्म्स क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नवीन देशबोईना यांनी केले आहे. सामान्य महिलेची ही असामान्य गोष्ट सांगणारा टीजर अंगावर रोमांच उभे करतो.


वास्तव घटनेवर आधारित या चित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे.  तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.


आराबोथु कृष्णा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. 'एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वःतला ओळखण्याचा अवकाश आहे'' असे लता करे सांगतात. वयाच्या मर्यादा ओलांडत नियतीवर मात केलेल्या सामान्य महिलेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा असलेला 'लता भगवान करे' हा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.