महापौर, आयुक्तांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

 
महापौर, आयुक्तांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

 

पुणे : दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेक भागातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले होते. आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी कात्रजपासून आंबील ओढ्यापर्यंत पाहणी केली. यावेळी माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक प्रकाश कदम, वसंत मोरे आदी उपस्थित होते.

 

कात्रज तलावाची भिंत कोसळल्याने पाण्याचा लोंढा वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याची बाब आबा बागुल यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून दिली. सोसायट्यामधून येणारे सांडपाणी बंद पाईप लाईनद्वारे नदीकडे घेऊन जावे. त्यामुळे नाल्यावर पाण्याचा अतिरिक्त ताण येणार नाही व भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवणार नाही, असेही आबा बागुल यांनी सुचवले.

 

सौरभ राव यांनी ही बाब मान्य करून यापुढे ही परिस्थिती येणार नाही, यादृष्टीने ठोस पावले उचलून कार्यवाही केली जाईल. तसेच पूरग्रस्त भागात नागरिकांचे झालेले नुकसान, सीमा भिंत, पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली. महापौर मोहोळ यांनीही पुरग्रस्तानाचे म्हणणे ऐकून घेत योग्य मदत करू, असे आश्वासन दिले.

 


----------------------------------------