ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य                                                                                    - उपआयुक्त जयंत पिंपळगावकर

ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य
                                                                                   - उपआयुक्त जयंत पिंपळगावकर
  पुणे दि.24 : ग्राहक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी ग्राहक हिताचे विविध निर्णय घेण्यात येत आहेत. ग्राहकांचे संपूर्ण हित जोपासल्या जाणार असल्याचा विश्वास उपआयुक्त जयंत पिंपळगावकर यांनी आज व्यक्त केला.
         शिवाजीनगर बसस्थानक येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन श्री. पिंपळगावकर यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती नीता शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमती अस्मिता मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल, एसटीच्या विभाग नियंत्रक श्रीमती यामिनी जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, ग्राहक पंचायत सदस्य श्री.लेले आदी उपस्थित होते.
  राज्याच्या ग्राहक चळवळीत ग्राहक पंचायतीचे मोठे योगदान राहीले असल्याचे सांगून उपआयुक्त पिंपळगावकर म्हणाले, ग्राहक हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. शासनाने ग्राहकांच्या तक्रारीवर जलद गतीने निर्णय होण्यासाठी 'ग्राहक संरक्षण कायदा केला आहे. ग्राहक संरक्षण कायदा व यंत्रणेच्या कार्याची माहिती व ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव सातत्याने होणे आवश्यक आहे. ग्राहकांचे अधिकार व कर्तव्याबाबत प्रबोधन आवश्यक असून यासाठी स्वंयसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचे पिंपळगावकर यांनी सांगितले.
     प्रास्ताविक करताना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शिंदे म्हणाल्या, ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोग आहेत. ग्राहक संरक्षण व तक्रारीचे जलद निवारण करण्यात येते. ग्राहकांच्या हक्क व कर्तव्याची माहिती करून देण्यासाठी आज येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
  कृषी, आरोग्य, परिवहन विभागासह विविध विभागाच्या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रवासी उपस्थित होते. 
00000