तमाशा कलाकारांचा आमरण उपोषणाचा इशा

 पुणे प्रवाह‌ न्युज पोर्टल


*तमाशा कलाकारांचा आमरण उपोषणाचा इशारा*

-------- 

राज्यात हळूहळू सर्व व्यवहार सुरु झाले असले तरीही अद्याप सरकारकडून गावजत्रा, तमाशा, लावणी, ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळाली  नाही. आम्हाला न्याय मिळावा, म्हणून आम्ही “तमाशा पंढरी नारायणगांव” येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन सरकारने कलावंतांना मदत म्हणून १८ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करुन अर्थखात्याकडे पाठविलेले असल्याचे सांगितले. परंतु अद्याप अर्थ खात्याने या पॅकेजला मंजुरी दिली नाही. मराठी कलावंतांवर हा अन्याय आहे. त्यामुळे आमची सहनशक्ती संपली आहे. म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व तमाशा फड, लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाट्य इ.सर्व क्षेत्रातील कलाकारासहित प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (८ जानेवारी) सकाळी ९ वाजल्यापासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती लोकनाट्य तमाशा फडमालक व कलावंत विकास संघाचे अध्यक्ष कलाभूषण मा रघुवीर खेडकर यांनी दिली. 

आज तमाशा फड मालक व कलावंत विकास संघ-नारायणगाव यांच्या तर्फे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर, कार्याध्यक्ष तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर , सचिव मुसा इनामदार , परिवर्तन कला महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमर पुणेकर,किरण कुमार ढवळपुरीकर, संजय दत्ता महाडीक, शांताबाई संक्रापूरकर, गुलाब हाडशीकर, राजा बागुल, बाळासाहेब बेल्हेकर, कैलास नारायणगावकर कलाकार उपस्थित होते.

कार्याध्यक्ष मंगला बनसोडे म्हणाल्या, राज्यात सुमारे दीडशे लहान-मोठे तमाशा फड असून या फडाच्या माध्यमातून ७ ते ८ हजार कलावंत आपली कला सादर करून २५ ते ३० हजार कुटूंबियांची उपजिविका करत आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात अंदाजे ५०० ते ६०० गाव जत्रा असतात. परंतु मार्च २०२० मध्ये सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने सर्व व्यवहार बंद झाले. गावयात्रा रद्द झाल्या आणि सर्व तमाशा फड बंद पडले. तमाशातून उपजीविका करणाऱ्या हजारो लोकांची उपासमार झालेली आहे, आणि आजही होत आहे. 

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले लोक कलावंतांसाठीचे १८ कोटी रुपयांचे पॅकेज त्वरीत मंजूर करुन आम्हाला मदत मिळावी. तसेच महाराष्ट्रातील विशेषत: पुणे, सातारा, अहमदनगर, बीड वगैरे जिल्ह्यात ग्रामस्थांमार्फत होत असलेल्या गाव जत्रेत तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी मिळावी. या दोन मागण्या त्वरीत मंजूर केल्या जाव्यात. 

अमर पुणेकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर सर्व महानगरपालिकांनी कलाकारांसाठी मोफत वैद्यकीय सेवा द्यावी व कार्यक्रमाच्या गाड्यांना टोल माफी मिळावी. सरकारने आमच्या मागण्यांचा आणि आमचा सहानुभूतिपुर्वक विचार करून याविषयी समाधानपूर्वक उत्तर न दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा लोकनाट्य तमाशा फड मालक व कलावंत विकास संघ-नारायणगाव यांनी दिला.तसेच यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला.