महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



दिनांक : 3 डिसेंबर 2020


महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही


जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही


वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही


            मुंबई, दि. ३ : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी दिली.


          सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार,आमदार यावेळी उपस्थित होते.


          यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, खासदार श्री. पवार, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसुल मंत्री श्री. थोरात, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.अदिती तटकरे,  सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र थांबला नाही,थांबणार नाही' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.


          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार काम


          संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार हे शासन काम करीत असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच वर्षभरात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले असून पुस्तिकेच्या उत्तम निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.


संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम- खा. शरद पवार


          खासदार शरद पवार म्हणाले की, हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नविन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.


समर्थ महाराष्ट्राला घडविण्याचा निर्धार- उपमुख्यमंत्री अजित पवार


          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघभावना निर्माण करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विविध विभागांच्या निर्णयांचा समावेश असलेली ही पुस्तिका प्रकाशीत केल्याबद्दल त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले.


नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा- महसुलमंत्री  बाळासाहेब थोरात


          महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी,चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसुलमंत्री श्री. थोरात यांनी केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक,विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.


          उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


0000


अजय जाधव..३.१२.२०२०


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image