वैयक्तीक सदवर्तनाशिवाय परिवर्तन अशक्य – उल्हास पवार

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


वैयक्तीक सदवर्तनाशिवाय परिवर्तन अशक्य – उल्हास पवार

पुणे – सध्या भाषणात क्रांती, परिवर्तन असे शब्द वापरल्याशिवाय कोणाचंही भाषणचे पूर्ण होत नाही. यातील परिवर्तन या शब्दात वर्तन जे सांगितले असून ते कोणीच लक्षात घेत नाही. भगवान महावीरांनीच सत्तावीसशे वर्षापूर्वीच वैयक्तीक आचारणाचे महत्व सांगून ठेवले आहे. त्यामुळे वैयक्तीक सदवर्तनाशिवाय व्यक्तीत किवा समाजात परिवर्तन होणे किंवा घडणे अशक्य आहे. वैयक्तीत सदवर्तनाची आज समाजाला खरी गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी आज केले.

सोलापूर येथे पुढील वर्षी होणा-या २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूरचे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब पाटील यांचा पुणेरी पगडी, स्मृतीचिन्हं शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्याहस्ते महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ टिळक रोड येथे करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन जैन सहयोग आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानने केले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मराठी साहित्य परिषदेच्यावतीने स्मृतीचिन्हं देऊन परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार केला.

कलागौरव प्रतिष्ठानचे ऍड अध्यक्ष अभय छाजेड, सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे वृत्तदर्शन चॅनेलचे संपादक डॉ. शैलेश गुजर, अरूण खोरो व सुनील महाजन जैन सहयोगचे मिलिंद फडे आणि मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाल जितेंद्र शहा, अजित पाटील, कैलास ठोले, सुदीन खोत, राजेंद्र सुराणा, सुरेंद्र गांधी, विनित पारनाईक, नंदन देऊळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे यांनी ईशस्तवनाने केली.

उल्हास पवार म्हणाले, भगवान महावीरांनी सत्य, अहिंसा, न्याय, कर्म आचारण याची शिकवण दिली. त्यांनी जात ही आचरणातून येते असा सिद्धांत मांडून आचरणाचे महत्व सांगितले आहे. हाच सदआचरणाचा विचार पुढे भागवत संप्रदायाने पुढे नेल्याच बघायला मिळते.  भगवान महावीरांचीच सत्य, अहिंसा, सदआचरणाची शिकवण महात्मा गांधी यांनी दिली आहे. आपल्या तोंडात गेल्याने न दिसणा-या जीवतंतूंनाही आपल्यापासून अपाय होऊ नये म्हणून भगवान महावीरांनी त्यावेळी तोंडाला पट्टी लावणे सुरू केले. जीवजंतूनाही अपाय होऊ न देण्याचा मोठा विचार त्यांनी आपल्या आचरणातून, वर्तनातून सांगितला आहे. तो आज करोनामुळे आपण आचणात आणत आहोत.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ही दार्शनिकांची भूमी आहे. जैन दर्शन म्हणजे विश्व हे नैसर्गिक असल्याचे सांगते. तिथे जीव अजीव, सचेतन - अचेतन असे दोनच घटक असून यातूनच विकृती निर्माण होतात. या विकृती दूर करणे महत्वाचे असून त्यासाठी जैन सत्पुरूषांनी आचरणाला महत्व दिले आहे. सध्या सुरू असलेल्या शाब्दीक हिंसाचारामुळे मनाला जखमा होत आहेत. त्यातून समाजमन दुभंगत आहे. हे दुभंगणारे समाजमन कसं सांधायचे याचे चिंतन मराठी जैन साहित्य संमेलानात व्हावे. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण अशी सर्वच क्षेत्रे गढूळ होत असून चिखल कालवण्याचे षडयंत्र सुरू असल्याने समाज विवेकाला आवाहन करणारे चिंतन या संमेलानात होईल कारण या संमेलनाला समाजमनस्क अध्यक्ष डॉ. पाटील यांच्या रूपाने लाभले आहेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ. रावसाहेब पाटील म्हणाले, आज पुण्यात आणि त्यातही कुसुमाग्रज, स्वामी विद्यानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या वास्तूत आपला पहिला सत्कार होत असल्याने अंत:करण भरून आलेले आहे. जैन धर्म आणि मराठी भाषा यांचा अगदी जवळचा संबंध कसा आहे हे सांगून ते म्हणाले, मराठी भाषेचा जन्म, तिचं पालन पोषण जैन साधूसंताना आपल्या अंगाखांद्यावर केले आहे. समाजातील स्थित्यंतरे, भाषा, संस्कृती यांचे अवलोकन करण्यासाठी संमेलने आवश्यक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेनंतर १०६ वर्षांनी करवीर येथे जैन साहित्य परिषदेची विदोहातून किंवा असंतोषातून झालेली नसून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी झालेली आहे असे सांगुन सर्वांनी साहित्य संमेलनाला यावे असे आग्राहाचे निमंत्रण त्यांनी दिले. देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करून लोकशाही व सर्वधर्मसमभाव ही उदात्त मूल्ये अधिक रूजवली गेली पाहिजेत असे सांगितले.

महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी 2021 या दिवशी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांचे महात्मा गांधी आणि जग हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच जागतिक मराठी दिनाच्या दिवशी (27 फेब्रुवारी 2021) जैन धर्मातील तीर्थ क्षेत्रांच्या महितीचे सचित्र कॅलेंडर, कॉफी टेबल बुक तसेच यापूर्वी झालेल्या 24 मराठी जैन साहित्य संमेलनाचा आढावा घेणा-या  स्मरणिकेचे विमाचन जैन सहयोग व मराठी भाषा संवरधन प्रतिष्ठानच्यातीने करण्यात येणार आहे. रौप्यमहोत्सवी सोलापूरच्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलानाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष साहू अखिलेश जैन उपस्थित रहाणार असल्याचे मिलिंद फडे यांनी जाहीर केले.

यावेळी अरूण खोरे, ऍड अभय छाजेड, सुनील महाजन, संजय नहार, डॉ. शैलेश गुजर यांनीही मनोगत व्यक्त करून डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तिविक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी केले. डॉ. रावसाहेब पाटील यांचा परिचय मिलिंद फडे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन सुजाता शहा यांनी केले.

फोटो ओळी – सोलापूर येथे होणा-या २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब पाटील यांचा पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, जैन सहयोग मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानथच्यावतीने सत्कार आला. त्याप्रसंगी डावीकडून सुनील महाजन, अभय छाजेड, अरूण खोरे,  मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. रावसाहेब पाटील, गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, प्रवीण प्र. वाळिंबे, संजय नहार, मिलिंद फडे, डॉ. शैलेश गुजर

-    सोलापूर येथे २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, जैन सहयोग व मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब पाटील यांचा सत्कार कराताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डावीकडे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार.