पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोना काळात कामगारांना मंजुर करण्यात आलेला "प्रोत्साहन भत्ता" (कोविड भत्ता) कामगारांना तात्काळ देण्याची मागणी
● भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी दि.१४ (प्रतिनिधी) - कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेच्या विविध भागात काम करणाऱ्या कामगारांना लॉकडाऊनच्या एकुण ६५ दिवसापैकी हजर असणाऱ्या दिवसाला प्रत्येक दिवसाला रुपये १५०/- प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी व प्रत्येक विभागाला तसे आदेश देऊनही प्रशासनाने हजारो कष्टकरी कामगारांना मिळणारा हा भत्ता अद्यापही दिलेला नसल्याने हा भत्ता कामगारांना तात्काळ मिळण्यासाठी भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस किशोर हातागळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली आहे.
भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हणले आहे की, "महाराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि २४ मार्च ते २३ जुलै २०२० या कालावधीमध्ये ६५ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी जाहीर केला होता आणि या कालावधीमध्ये शासकीय वाहतुक व्यवस्था व सर्व हॉटेल व रेस्टॉरंट बंद होते त्यामुळे वाहुतक व्यवस्था व भोजन व्यवस्था उलब्ध नसतानाही या कठीण महामारीच्या संकटसमयीही महापालिकेच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवाची कसलीही पर्वा न करता शहरातील नागरिकांचे आरोग्य शाबुत राहावे त्यांना या कोरोनाचा कसलाच प्रादुर्भाव होऊ नये व त्यांना पाणी, विज, सुरक्षा व आरोग्यव्यवस्था व इतर विविध सेवा मिळाव्यात यासाठी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. कायमस्वरूपी कामगारांनासोबत यात कंत्राटदाराकडे काम करणारे घंटागाडी आरोग्य कर्मचारी व सुरक्षारक्षक यासारखे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचाही यात समावेश होतो हा भत्ता त्यांना जर लवकर मिळाला तर काही आर्थिक प्रश्न त्यांचे लवकर सुटतील.
दि.२४ मार्च ते २३ जुलै २०२० या ६५ दिवसाच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या प्रमाणात हजर दिवसाप्रमाणे प्रतिदिन रुपये. १५०/- प्रमाणे प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात आपण दिनांक २१/१०/२०२० ला तसा प्रस्ताव मंजुर करून प्रशासनाला हा भत्ता देण्याचे आदेशही दिलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही विभागाने हा भत्ता आपल्याकडील कर्मचाऱ्यांना दिलेला नाही त्यामुळे महापालिकेतील वैद्यकीय मुख्य कार्यालये व नियंत्रणातील सर्व रुग्णालये, कोरोना कामकाज विविध कक्ष, पाणीपुरवठा विभाग, घंटागाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विद्युत विभागातील कर्मचारी, सुरक्षा विभाग, आपत्ती व्यवस्थापन यासह कोरोना काळात सेवा करणारे इतर शासकीय कर्मचारी व ठेकेदाराकडील कर्मचारी असे हजारो कर्मचारी या भत्त्यापासुन वंचित राहिलेले आहेत.
लॉकडाऊननंतर सर्वच कामगारांची आर्थिक परिस्थिती हालकीची झालेली असल्याने त्यांना आपण मंजुर केलेला हा कोविड प्रोत्साहन भत्ता प्रशासनाला तात्काळ देण्याचे आदेश देऊन ही रक्कम लवकरात लवकर कामगारांना मिळावी अशी व्यवस्था करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने करीत आहोत तरी याची आपण गांभीर्याने दखल घेऊन पुढील कार्यवाही तात्काळ करावी" असे त्यात नमुद केले आहे.