‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ संयोजित ऑनलाईन तीन दिवशीय  दुसर्‍या ‘राष्ट्रीय सरपंच संसद-२०’ ला उद्यापासून प्रारंभ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


                           दि. १ डिसेंबर २०२०


‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ संयोजित


ऑनलाईन तीन दिवशीय


 दुसर्‍या ‘राष्ट्रीय सरपंच संसद-२०’ ला उद्यापासून प्रारंभ


पुणे, दि. १ डिसेंबर: ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे’ अंतर्गत स्थापित ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ च्या विद्यमाने २ ते ४ डिसेंबर या दरम्यान तीन दिवशीय दुसरी ‘राष्ट्रीय सरपंच संसद -२०’ ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. उद्या सकाळी ११ वा. या सरपंच संसदेस प्रारंभ होईल.


केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत उद्घाटन सत्राचे तर केंद्रीय रस्त्ये दळणवळण आणि महामार्ग विकास विभागाचे मंत्री जेष्ठ नेते नितीन गडकरी, केंद्रीय कृषी व पंचायतराज विभागचे मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे समारोप सत्राचे प्रमुख अतिथी आहेत. तीन दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार्‍या ७ सत्रात या सरपंच संसदेत मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून मान्यवर वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या विविध राज्यातील सरपंच तसेच इतर ग्रामीण लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या संसदेत सहभागी होतील. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते व सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल विश्‍वनाथ कराड हे आहेत.


उद्घाटन सत्रात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, इस्त्राईल सहकार संस्थेचे प्रमुख दन अलुफ, महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, बाएफचे अध्यक्ष गिरीष सोहनी हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.


‘शाश्‍वत ग्रामविकासाचे नवीन यशस्वी प्रयोग’ या पहिल्या सत्रात ‘फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ या विषयावर ‘सह्याद्री फार्मर्स, नाशिक’, चे संचालक विलास शिंदे, स्वयंपूर्ण कृषी विक्री व्यवस्थापन या विषयावर अभिनव फार्मर्स क्लब, पुणेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर बोडके हे मार्गदर्शन करतील. जेष्ठ शेतकरी नेते पाशा पटेल सत्राचे अध्यक्ष असून बांंबू शेती व बांबू व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन करतील.


३ डिसेंबर रोजी आयोजित केलेले दुसरे सत्र ‘आत्मनिर्भर ग्रामपंचायत नियंत्रणाचे सूत्र’ या विषयावर होणार असून आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, आदर्श गाव निढळचे शिल्पकार चंद्रकांत दळवी आणि पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे मार्गदर्शन करतील.


कोल्हापूरचे छत्रपती राजे संभाजी महाराज हे ‘सीएसआर निधी- ग्राम विकासाचा एक प्रमुख आर्थिक स्त्रोत ’ या विषयावरील तिसर्‍या सत्राचे अध्यक्ष आहेत. हरियाणाचे कृषी मंत्री जयप्रकाश दलाल प्रमुख अतिथी आहे. वडझिरेचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सहव्यवस्थापक संदीप शिंदे व जालना कृषी विभागचे सहसंचालक विजय माईनकर हे प्रमुख वक्ते आहेत.


‘कोविड लॉक डाऊन काळातील ग्रामव्यवस्थापन- कार्यानुभव’ या विषयावरील चौथ्या सत्रात उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सुर्यप्रताप शाही हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार असून या सत्राचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतअप्पा पाटील राहतील. अकोला जिल्ह्यातील आदर्श गाव खैरगव्हाणचे सरपंच पुरूषोत्तम घोगरे, नाशिक जिल्ह्यातील ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, रत्नागिरी जिल्ह्यातील खंदाटपालटीचे सरपंच अजय महाडिक, पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडीचे सरपंच संतोष टिकेकर, वर्धा जिल्ह्यातील सर्कसपूरचे सरपंच निखिल कडू तर नांदेड जिल्ह्यातील शिबोरीचे सरपंच बाळासाहेब देशमुख हे आपला कार्यानुभव सांगतील.


४ डिसेंबर रोजी संपन्न होणार्‍या ‘ग्रांम संवाद कार्यक्रमात’ महाराष्ट्राचे ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संवाद साधण्यात येईल. समस्त सरपंचांचे प्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे अध्यक्ष दत्ता काकडे हे ज्वलंत ग्रामविकास समस्यांची मांडणी करून त्या सोडविण्यासाठी शासनाकडून असणार्‍या अपेक्षा व्यक्त करतील. श्री. हसन मुश्रीफ त्यावर मार्गदर्शन करतील.


समारोप सत्र जम्मू काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व केंद्रीय पशूसंवर्धन व दुग्ध विकास राज्य मंत्री प्रतापचंद्र सरंगी प्रमुख अतिथी आहेत. राजस्थानचे खासदार पी.पी. चौधरी, केंद्राचे माजी कृषी राज्यमंत्री हुकुमदेव यादव, केंद्रीय माजी ग्रामविकास राज्यमंत्री प्रदीपकुमार जैन व बाएफचे विश्‍वस्त आणि टाटा कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक किशोर चौकर हे विशेष अतिथी आहेत.


सरपंच, उपसरपंच, पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामीण लोक प्रतिनिधींनी तसेच ग्रामविकासाशी संबंधीतांनी मोठ्या संख्येने या सरपंच संसदेत सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील यांनी केले आहे.


या झूम लिंकवर क्लिक करा - https://zoom.us/w/91698673957? 


Please click this URL to join. https://zoom.us/w/91698673957?