ज्येष्ठ सनदी लेखापालासांठी 'आयसीएआय'तर्फे 'वी केअर' अभियान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल ज्येष्ठ सनदी लेखापालासांठी 'आयसीएआय'तर्फे 'वी केअर' अभियान


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखापरिक्षण व्यवसायातील वरिष्ठांच्या सुरक्षिततेची जबाबदारी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतली आहे. या व्यवसायातील वरिष्ठांचे योगदान लक्षात घेऊन ज्येष्ठ सनदी लेखापालांसाठी 'वी केअर' हे नाविन्यपूर्ण अभियान 'आयसीएआय'ने हाती घेतले आहे. 


या अभियानाचे केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते नुकतेच दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी 'आयसीएआय'चे अध्यक्ष सीए अतुल कुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निरंजन जांबूसारिया यांच्यासह केंद्रीय समितीचे सदस्य, 'पुणे आयसीएआय'चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्ढा, सचिव व खजिनदार सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.


'वी केअर' अभियानांतर्गत ज्येष्ठांसाठी तंत्रज्ञानाधारित साहाय्य पुरविणारी 'इकोसिस्टिम' तयार करणे, २४ बाय ७ मदतीसाठी हेल्पलाईन आणि वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींसाठी आर्थिक, तसेच आवश्यक सहायता करण्याचे उद्दिष्ट आहे. व्यवसायातील बंधुत्वाच्या, आपुलकीच्या भावनेतून ज्येष्ठांची काळजी घेण्यासह त्यांना सहकार्य करण्याचा मानस तरुण सनदी लेखापालांनी केला आहे. 


प्रसंगी बोलताना अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "'आयसीएआय'ने पिढ्यानपिढ्या कृतीशील आणि प्रगतीशील विचारांचे नेतृत्व प्रदान केले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर व्यवसायातील प्रगतीसाठी 'आयसीएआय' महत्त्वाची भूमिका बजावत आहे, तर सर्व क्षेत्रातील व्यवसाय, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातही त्यांचा हातभार आहे. काळाची गरज ओळखून 'आयसीएआय'चा हा पुढाकार कौतुकास्पद आहे. ज्येष्ठांची काळजी भारतीय परंपरा आणि मूल्यांचा एक भाग आहे. 'आयसीएआय'ने व्यवसायातील ज्येष्ठांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी या गोष्टी हृद्य आहेत. इतर संस्थांसाठी ही कृती आदर्शवत आहे. ज्येष्ठ आणि युवा पिढीतील नाते दृढ करण्याच्या भारतीय परंपरेला 'वी केअर'सारखे अभियान बळकटी देईल."


सीए अतुल कुमार गुप्ता म्हणाले, "संस्था सातत्याने आपल्या सर्व सदस्यांसाठी सर्वोत्तम गोष्टी करण्यास इच्छुक असते. सदस्यांच्या सुधारणा आणि प्रगतीसाठी प्रयत्न करते. गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या व्यावसायिक वातावरणाला निर्णायक कृती आणि विवेकी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सामोरे जाताना ज्येष्ठ सीए सदस्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या व्यावसायिक प्रगती आणि पाठबळाचा लाभ झालेला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ भावनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे."


सीए अभिषेक धामणे म्हणाले, "व्यवसायातील वरिष्ठ सीए सदस्यांना त्यांचे जीवन स्वाभिमानाने, स्वतंत्रपणे आणि सुरक्षित जगता यावे, यातही हे अभियान महत्वाचे आहे. पुणे शाखेअंतर्गत ज्येष्ठ सनदी लेखापालांना सर्वतोपरी मदत केली जाईल."