सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन व ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस यांच्यात सामंजस्य करार 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन व ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस यांच्यात सामंजस्य करार  


प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रशिक्षण दिले जाणार  


पुणे , दिनांक ४ नोव्हेंबर २०२० : 


 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन व ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि. यांच्यात आज बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी सामंजस्य करार करण्यात आला.  


या करारानुसार येत्या काळात प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन तर्फे आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. 


यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी फिलिप बेल, संचालक डॉ. भक्ता, तसेच भारतातील संचालक दत्तात्रय देवळे, गिरीश काळे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर म्हणाले, ''सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधनांना बाजारपेठेत व्यावसायिक रूपात आणण्याच्या दृष्टीने SPPU रिसर्च पार्क फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या मनुष्यबळासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेणे आज झालेल्या करारामुळे शक्य होणार आहे. तसेच पाणी हा एक प्रमुख नैसर्गिक स्रोत आहे, आणि सध्या पाण्याशी निगडित अनेक समस्या आपल्या समोर आहेत. परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतर गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. यापुढील काळात पाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या चांगल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन तर्फे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शिवाय या सामंजस्य करारामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ झाले आहेत, असे मला वाटते.''


यावेळी बोलताना ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष फिलिप बेल म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन या सेक्शन ८ कंपनीसोबत जोडले गेल्याबद्दल आम्हाला मनस्वी आनंद होतोय. येत्या काळात आम्ही भारतातील पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, याची मला खात्री वाटते. 


ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस ही संस्था प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये जगातील नामांकित संस्था आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस यांच्यातर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 


     याबाबत अधिक माहिती देताना SPPU रिसर्च पार्क फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, विशेष करून पाणी प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. पाणी प्रदूषणाबाबत प्रक्रिया केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचारी यांच्याकरिता हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे प्रशिक्षण असणार असून ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर सायन्सेस यांच्यातर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर येत्या काळात पर्यावरणाचे प्रदूषण करणारे घटक यांच्या संशोधनावरील विशेष अभ्यासक्रम SPPU रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे सुरु करण्यात येणार आहेत.