खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजप करते-सुरेश लाड…

पुणे प्रवाह न्युज पोर्टल खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजप करते-सुरेश लाड…


   विशेष: प्रतिनिधी कोकण  


             गणेश पवार


 रायगडचे खासदार सुनील तटकरे महाविकास आघाडीच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजप करत आहे, ही बदनामी यापुढे कदापी सहन केली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.


या पत्रकार परिषदेला शिवसेना सल्लागार बबन पाटील, काँग्रेसचे पनवेल शहरअध्यक्ष आर.सी.घरत, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, प्रशांत पाटील, नरेश गावंड, अविनाश म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकुर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, राष्ट्रवादीचे पेण शहर उपाध्यक्ष विशाल बाफना, प्रसाद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे बोलताना सुरेश लाड म्हणाले की, पेणच्या मुख्याधिकारी यांच्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते अनिरुद्ध पाटील व मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. नेत्यांनी महिला अधिकार्‍यांशी वागताना योग्यरीत्या वागावे, माता-भगिनींचा योग्य आदर राखावा, असा सल्लाही यावेळी लाड यांनी दिला.


भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पेण येथे बेकायदेशीरपणे काढलेला मोर्चा व घेतलेल्या सभेविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचा या पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.


    देवेंद्र फडवणीस व भाजपने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून दिला नाही. यासंदर्भात खासदार तटकरे यांनी लोकसभेत आवाज उठवून सदरची बँक विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे व त्यासाठी प्रयत्नशील आहेत. खासदार तटकरे यांची शैक्षणिक व राजकीय पात्रता काय आहे याची कल्पना संपूर्ण राज्याला आहे. त्यांची पात्रता जाणून घ्यायला भाजपच्या नेत्यांना आयुष्य खर्ची करावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.


     शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील म्हणाले की, राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे नेते प्रकाशझोतात राहण्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बाटगा माणूस असल्याची टीका बबन पाटील यांनी केली.