सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी यांच्यात सामंजस्य करार 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी यांच्यात सामंजस्य करार 


 'बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु होणार 


पुणे, दिनांक १८ नोव्हेंबर २०२० : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई यांच्यात आज बुधवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२० रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार येत्या शैक्षणिक वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे 'जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु होणार आहे. हा सामंजस्य करार विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. 


यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ.(कॅप्टन) चंद्रशेखर चितळे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी (IIGJ), मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साळी, इन्स्टिट्यूटचे प्रमुख संजोय घोष, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, पुणे (MCCIA) चे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, सहायक प्राध्यापिका डॉ. आदिती मुखर्जी, स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या मुख्य समन्वयक डॉ. पूजा मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. रवी आहुजा, वरिष्ठ सहायक विकास बराथे, सहायक प्राध्यापिका शिवानी हर्षे, सहायक प्राध्यापक पंकज सवडतकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना कुलगुरू प्रा.(डॉ.) नितीन करमळकर म्हणाले,' बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा अभ्यासक्रम नोकरीभिमुख अभ्यासक्रम असल्याने १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक उत्कृष्ट अशी संधी आहे. सध्या जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन या क्षेत्राने संपूर्ण जगातील उद्योजकांचे लक्ष आकर्षित केलं आहे. शिवाय संशोधन क्षेत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक आहे, त्यामुळे भविष्यात 'जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' या क्षेत्रातही विद्यापीठात उत्तम असे संशोधन केलं जाईल, अशी मला आशा आहे.'  


  यावेळी बोलताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी (IIGJ), मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साळी म्हणाले,'बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा एक नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम आहे. या क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता जेम्स अँड ज्वेलरी डिझाईनशी निगडित उद्योगांमध्ये भरपूर संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी जोडले गेल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन ऑफ इंडिया आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांनी २००२ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना करण्याचा मुख्य हेतू ज्वेलरी उद्योगासाठी जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा आहे. ' 


यावेळी बोलताना स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ.(कॅप्टन) चंद्रशेखर चितळे म्हणाले,' बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी स्वयंरोजगार सुरु करू शकतील, अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवणारा असा हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे सुरु होतो आहे.'  


यावेळी आभार प्रदर्शन सहायक प्राध्यापिका डॉ. आदिती मुखर्जी यांनी केले.