खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमला दिल्या सदिच्छा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमला दिल्या सदिच्छा


 पुणे :- लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे निर्माते निर्माते संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची पूर्णाकृती मूर्ति उर्विता प्रॉडक्शन्सच्या वतीने भेट देण्यात आली.


या भेटीबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खासदार उदयनराजे भोसले यांनी माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या "सरसेनापती हंबीरराव" या बिग बजेट चित्रपटाचे निर्माते संदीप मोहित पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांच्यासह रणजीत ढगे पाटील, डॉ. रणजीत निकम यांनी भेट घेऊन चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर येत असताना आजच्या पिढीला स्वराज्याच्या शिलेदारांची महती समजत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. सरसेनापती हंबीरराव चित्रपट टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’


या विषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा आपला चित्रपट आहे त्यामुळे त्याचे प्रमोशन अगदी हक्काने मीच करणार हे आवर्जुन सांगितल्याने आमच्या संपूर्ण टीमला खऱ्या अर्थाने दहा हत्तींचं बळ मिळालं आहे.