मुखपट्टीविना ( मास्क ) फिरणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडूनही कारवाई; सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेचा निर्णय.......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात मुखपट्टीविना ( मास्क )फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मुखपट्टीविना ( मास्क ) फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिस प्रशासनास देऊ केले आहेत. त्यानुसार पालिकेच्या पथकाबरोबरच पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारची कारवाई सुरू होणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शासकीय आणि खाजगी कार्यालये या ठिकाणी वावरताना नागरिकांना मुखपट्टी ( मास्क )वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही काही नागरिक मुखपट्टीविना ( मास्क )फिरत असून यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली असून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकरण्यात येत आहे. ही कारवाई आणखी प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या तिजोरीत भर पडावी या उद्देशाने नव्हे तर, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मोहीम नियमित राबविली जाईल, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी म्हटले आहे.