पुणे प्रवाह न्युज पोर्टल
एमआयटी डब्ल्यूपीयूत सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेच ऑनलाईन उद्घाटन
पुणे, 2 ऑक्टोबर:“ सुंदर समाज निर्मितीसाठी अध्यात्माचा अंध विश्वास आणि विज्ञानाचा उपयोग विनाशासाठी करू नये. अशांती आणि दहशतवादाच्या छायेत असलेल्या समाजाला शांती हवी असेल तर सर्वांना अध्यात्माच्या मार्गावर चालून प्रेम आणि अहिंसेचा आधार घ्यावा.” असे आव्हान छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसुईया उइके यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन आणि जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा उपस्थित होते.
अनसुईया उइके म्हणाल्या,“ विज्ञान हे बाह्य जगात घेऊन जाते तर अध्यात्म हे अंर्तमनात घेऊन जाते. दोघांचाही मार्ग वेगळा असून विज्ञान हे भौतिक तर अध्यात्म हे अभौतिक आहे. विनोबा भावे यांनी सांगितले होते की धर्म आणि राजकारणाचा मार्ग संपलेला असून आता अध्यात्माच्या मार्गावर चालावे. विज्ञानाच्या युगात विज्ञान आणि अध्यात्माला अधिक जोर दयावा लागेल. तसेच, स्वामी विवेकानंद यांनी सुखाची कल्पना मांडतांना सांगितले की, विज्ञानाबरोबर धर्माचा समन्वय साधावा. हे दोन्ही एकत्र आल्यास मानवतेचे कल्याण होईल.विज्ञान हे समाज कल्याणासाठी कार्य करते तर अध्यात्माच्या आधारे मन स्थिती चांगली होते व त्यातून शरीर उत्तम राहते.”
“कोविड 19 च्या काळात अध्यात्माच्या नियमांचे पालन केल्यास व्यक्ती मनः शांती मिळवू शकतो. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने या संसदेचे आयोजन करून देश व जगाला शांती देण्याचे जे कार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे. वास्तविक शांती ही कोणाच्या हातता किंवा पायात नाही तर ती मनात असते. त्यामुळे मनातून अशांतीचे विचार बाजूला सारून शांती निर्माण करावी.”
व्ही.मुरलीधरन म्हणाले,“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बंधुत्व, अहिंसा आणि शांतीचे तत्व युवकांना सांगून त्यांना प्रेरित करणे गरजेचे आहे. वसुधैव कुटुम्बकमच्या तत्वाचे पालन करणारा भारत संपूर्ण जगाला आध्यात्मिक ज्ञान देऊन शांती स्थापित करू शकतो. तक्क्षशीला आणि नालंदासारख्या विद्यापीठाने संपूर्ण जगाला ज्ञानाचे दार उघडे करून दिले होते. आजच्या काळात प्रत्येकाला विज्ञानापेक्षा अधिक आध्यात्माची गरज आहे.”
“ शिक्षणाद्वारे प्रगती होते हे लक्षात ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली आणून भारताल नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले आहे. कोविड 19 च्या काळात संपूर्ण जगात मोठे परिवर्तन आले आहे. अशा वेळेस शिक्षण क्षेत्रात डिजिटल शिक्षण प्रणाली आल्यामुळे ते सोपे झाले आहे. विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयाच्या आधारीत शिक्षण देणारी आपल्या संस्थेचे नेतृत्व हे सर्वोत्तम आहे. प्रगतीसाठी प्रत्येक वेळेस नवी कल्पना हवी असते जी आपल्या देशाकडे आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ 21 व्या शतकात आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावरच भारत विश्वगुरू म्हणून उदयास येईल. आत्मज्ञान, राजकारण आणि जय जगतचा संदेश विनोबा भावे यांनी संपूर्ण मानवजातीला दिला आहे. विश्वची माझे घरची प्रेरणेतून विश्वात शांतता प्रस्थापित होईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विज्ञान आणि अध्यात्माला आपल्या जीवनात उतरविल्यास ते शांतीमय होईल. अध्यात्माला धार्मिक शास्त्र व अंधश्रध्दा म्हणून पाहू नये. अध्यात्माने मनला शांती मिळते. भारतीय संस्कृती, परंपरेचा आणि तत्वज्ञानाचा संदेशच संपूर्ण जगात शांती व सुख नांदेल.”
राहुल कराड म्हणाले,“ विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी करण्याची आज गरज आहे. तरूणांमध्ये विधायक मानसिकता रुजविण्याची गरज आहे.”
प्रा. मिलिंद पांडे यांनी वर्ल्ड पार्लमेंटची पार्श्वभूमी सांगून या पार्लमेंटच्या माध्यमातून समाजात शांतता निर्माण करण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजे. त्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे भूमिका काय असेल हे सांगितले. डॉ. एन.टी.राव यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चालणार्या कार्याची माहिती दिली.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.