मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे समाजकार्य

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे, 10 ऑक्टोबर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गजन्य काळात प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, पण या बद्दल खेड्यांमध्ये अशी जागृती दिसत नाही. ही गोष्ट लक्षात ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीमधील (टीम फार्मा पिक्सेल) च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जागृती करण्याचा विडा उचलला आहे. याकरीता त्यांनी मुळशी मधील अंबडवेट गावाला भेट देऊन मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.


जेमतेम हजारो वस्तींच्या या गावातील सर्व लहान मुले, स्त्रिया, पुरूषां आणि शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक सूचनांबद्दल मार्गदर्शन केले. या गावातील समस्त ग्रामवासियांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. एमआयटीच्या स्कूल ऑफ फार्मसीमधील विद्यार्थी प्रथमेश मारणे, इशा ओसवाल, सुयश बागड, देविका नाईक, हर्षल मुंदडा, सिद्धेश जोगळेकर, निधी सबणे आणि आर्या गिजारे यांनी येथील नागरिकांना समजावून सांगितले की मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर कसा करावा. तसेच वेळो वेळी साबणाचा वापर करून स्वच्छ हात धुण्याचे लाभ काय आहेत.


विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ.बी.एस. कुचेकर, हेड ऑफ स्कूल डॉ. अक्षय बाहेती व इतर सर्व पदाधिकार्‍यांनी आणि शिक्षकांनी कौतुक केले.


जनसंपर्क विभाग,


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे