पुणे प्रवाह न्युज पोर्टल
चूक
पुणे : करोनाच्या परिस्थितीतही पुणे स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण क्षमतेने सुरू असून स्मार्ट सिटी मिशनमध्ये पुणे शहर महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे, तर देशात तेरावे स्थान प्राप्त केले आहे. तसेच, यामुळे एकूण क्रमवारीत महाराष्ट्र राज्यालाही वरचे स्थान प्राप्त झाले आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली.
प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती अद्ययावत करण्यात येते, त्याप्रमाणे केंद्र शासनाच्या वतीने क्रमवारी तथा रँकिंग करण्यात येते. यामुळे कामगिरीच्या अनुषंगाने पुणे स्मार्ट सिटीचे क्रमवारीतील स्थान तथा मानांकन उंचावले आहे. पुण्याने राष्ट्रीय क्रमवारीत १५व्या स्थानावरून आता १३व्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉकडाऊनपूर्वी पुणे सतराव्या क्रमांकावर होते. आता तेरावे स्थान प्राप्त केले आहे.
सुधारित मानांकनाबद्दल समाधान व्यक्त करून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे स्मार्ट सिटीने प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा वेग वाढवला असून प्रगतिपथावरील प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटी मिशनमधील पुणे शहराचे स्थान आणखी उंचावेल असा विश्वास आहे. स्मार्ट सिटी योजनेतील नियोजित प्रकल्पांसोबतच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्येही माहिती व्यवस्थापनात पुढाकार घेतला आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वॉर रूम म्हणून अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला आहे.”
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, “पुणे स्मार्ट सिटीने लॉकडाऊनपूर्वी सुरू केलेली कामे निरंतर सुरू ठेवली आहेत. तसेच करोना प्रतिबंधासाठी पुणे स्मार्ट सिटीने आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली (HMIS) प्रकल्पाअंतर्गत नवे डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी सर्वतोपरी योगदान देत आहे. एकंदर कामगिरीमुळे स्मार्ट सिटीचे स्थान निश्चितच आणखी उंचावेल.”
मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टम्स (एमआयएस) म्हणजे तंत्रज्ञान, संस्था आणि लोक यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारी प्रणाली आहे. संस्था किंवा कंपन्यांना कर्मचारी, उपकरणे आणि व्यवसाय प्रक्रियेत समन्वय ठेवण्यास व क्रमवारीत एमआयएस प्रणाली साह्य करते. यातील माहितीच्या अनुषंगाने शहरांचे स्थान दिसते. या प्रणालीमध्ये पुणे स्मार्ट सिटीची अद्ययावत माहिती भरण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील शहरांचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन
पुणे- 13, नाशिक- 18, ठाणे- 22, नागपूर- 31, पिंपरी चिंचवड- 41, सोलापूर- 50, कल्याण डोंबिवली- 65, औरंगाबाद- 68