तिसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची स्वदेशी लस ? १५ ते २० हजार स्वयंसेवकांवर चाचणी होणार...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


तिसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची स्वदेशी लस ?


१५ ते २० हजार स्वयंसेवकांवर चाचणी होणार......


 नागपूर : भारत बायोटेकद्वारे निर्मित कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी पंधरा ते २० दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत देशभरातील १५ ते २० हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाईल. चाचणीत प्रथमच आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूरच्या गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलकडून तिसऱ्या टप्प्याच्या  चाचणीचे केंद्र मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत बायोटेकद्वारे निर्मित लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. परंतु तिसऱ्या टप्प्यात मोठय़ा स्तरावर ही चाचणी होणार आहे. त्यासाठी देशभरातील १० ते १२ केंद्र निवडण्याची प्रक्रिया भारत बायोटेककडून सुरू झाली आहे. या टप्प्यात तब्बल १५ ते २० हजार स्वयंसेवकांना लस दिली जाणार असल्याने प्रत्येक केंद्राच्या वाटय़ाला एक ते दीड हजार लस येणार आहेत. या तिसऱ्या टप्प्यातील लसीचे केंद्र मिळवण्यासाठी नागपुरात गिल्लुरकर रुग्णालयाकडूनही प्रयत्न सुरू आहेत. गिल्लुरकर रुग्णालयामध्ये पहिल्या टप्प्यात ५५ जणांना तर दुसऱ्या टप्प्यात ५० जणांना लस दिली गेली. ही लस आणि त्यानंतर २८ दिवसांनी दिली गेली. दुसऱ्या टप्प्यातील सगळे स्वयंसेवक १२ ते ६५ वयोगटातील होते. एकूण स्वयंसेवकांत २२ महिला, २८ पुरुषांचा समावेश होता. त्यात १२ ते १८ वयोगटातील ८ मुले, ६० ते ६५ वयोगटातील ५ ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश होता. लस दिल्यानंतर कुणामध्येही काही समस्या उद्भवली नसल्याचे  रुग्णालयाचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले.