पुणे प्रवाह न्युज पोर्टल बातमीचा दणका....... नवजात बालक आणि विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करावी-आरोग्य सभापतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 16वर्षाच्या मुलीकडून करून घेतली स्वच्छता


-------- नातेवाईकांनी पोलिसात दिली तक्रार--------


 


कर्जत दि.6 गणेश पवार


                 कर्जत तालुक्यातील बीड गावातील पूनम राजेंद्र रुठे यांचा बाळंतपणानंतर झालेला रक्तस्त्राव आरोग्यसेविका यांना थांबवता आला नाही आणि त्यात त्या मातेचे निधन झाले होते.तर त्या मातेच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे देखील निधन झाले असून नवजात बालक आणि विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार धरून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका यांना तात्काळ निलंबित करावे अशी सूचना आणि आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी नेरळ येथे या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दिले.


                 तालुक्यातील बीड येथील विवाहित महिला पूनम राजेंद्र रुठे या गरोदरपणात आपल्या माहेरी आली होती.4ऑक्टोबर रोजी त्यांचे बाळंतपण नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी सात वाजता झाले.मात्र त्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राने जबाबदारी झटकत बाळंतपणानंतर दोन तास रक्तस्त्राव थांबत नसताना देखील पनवेल येथे पाठवून दिले.त्यात त्या मातेचा उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला तर त्या मातेच्या पोटी जन्मलेले नवजात बालक देखील मृत झाले होते आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील मोठी खळबळ माजली होती.तालुक्यात सर्व थरातून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभारावर जोरदार टीका झाल्याने आज 5 ऑक्टोबर रोजी दुपारी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि मृत महिलेचे गाव ज्या जिल्हा परिषद गटात आहेत,त्या गटाचे सदस्य सुधाकर घारे यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.तेथे कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे,गटविकास अधिकारी बाळाजी पुरी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी आक्रमक भूमिका घेत नवजात बालक आणि माता यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि बाळंतपण करणाऱ्या निवासी आरोग्यसेविका संगीता सरोदे यांना तात्काळ निलंबित करावे अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांना दूरध्वनी वरून बोलताना केली.हा संतापजनक प्रकार घडल्याने समाजातील विविध कार्यकर्ते हळहळ व्यक्त करीत असून चौकशीसाठी जिल्ह्यातून अधिकारी येणार म्हणून अनेक कार्यकर्ते नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते.सुधाकर घारे यांच्या समोर सुरेश काळण,अरुण कराळे,संतोष जामघरे,गोरख शेप,संजय कराळे, केशव मुने,एन डी म्हात्रे आणि अनेक कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.


                त्याआधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोरे आणि गटविकास अधिकारी पुरी यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश धाडवड आणि आरोग्यसेविका संगीता सरोदे यांची चौकशी केली.त्याचवेळी मृत पूनम रुठे यांचे नातेवाईक देखील उपस्थित होते,त्यांच्याशी देखील गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी चर्चा केली.त्यात अनेक धक्कादायक प्रकार बाहेर आले आहेत.मृत विवाहित महिला पूनम रुठे यांच्यासोबत त्यांची मामे बहीण अपेक्षा मुने ही 4 ऑक्टोबर रोजी बाळंतपणाच्या वेळी काही मदत लागल्यास सोबत असावी म्हणून आली होती.त्या 16 वर्षाच्या मुलीला पूनम रुठे यांच्या बाळंतपणानंतर रक्ताने बरबटलेले स्ट्रेचर,बेड वरील चादर आणि बेडशीट आरोग्यसेविका सरोदे यांनी स्वच्छ करून धुवून द्यायला लावले होते.तर त्या दिवशी ड्युटीवर असलेले डॉ धाडवड हे शनिवार 3ऑक्टोबर रात्री पासून दवाखान्यात नव्हते.पण त्यांच्या हजर असल्याच्या सह्या हजेरी बुकावर आढळून आल्या आहेत.याबद्दल गंभीरपणे चौकशी करण्यात येईल असे सूचित करण्यात आले.तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोरे यांनी आपला अहवाल आजच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पोहचेल.त्यात आपण डॉक्टर आणि आरोग्यसेविका यांना तात्काळ निलंबित करावे असे सूचित केले असल्याची माहिती मृत महिलेच्या नातेवाईक यांना दिली.