माथेरान मधील रग्बी हॉटेल मधील 25 कामगारांना पाच महिने पगार नाही... पुन्हाकामावर घेण्यास देखील टाळाटाळ..... रिलायन्स कंपनीच्या मालकीचे हॉटेल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 कर्जत,ता.18 गणेश पवार


                  रिलायन्स ग्रुपच्या मालकीचे हॉटेल असलेल्या माथेरान मधील रग्बी हॉटेल मधील 10 वर्षे नोकरी करणारे आदिवासी कामगार यांना पाच महिने पगार दिला नाही.तर संचारबंदी मध्ये कामावर येऊ नका असे हॉटेल व्यवस्थापन यांनी सांगितले,पण आता तेच हॉटेल प्रशासन त्यांना हॉटेलच्या गेट वर उभे राहू देत नाही.दरम्यान,रग्बी हॉटेलच्या प्रशासनाने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे आदिवासी कामगार देखील संतापले असून त्यांनी न्यायासाठी धावाधाव सुरू केली आहे.


                  माथेरान या जग प्रसिद्ध पर्यटकस्थाळ आसलेल्या माथेरान या ठिकाणी नावजलेले हॉटेल द रग्बी हे हॉटेल रिलायन्स कंपनीचे आहे.या हॉटेल मध्ये माथेरानच्या पायथ्याशी आसलेल्या आदिवासी वाड्या आणि गावातील तरुण जे काम करतात. मोलमजूरी आणि पडेल ते काम करत असलेले हे तरुण दररोज रात्री उशिरा डोंगर उतरून घरी पोहचत असतात.ऊन-पाऊस,थंडी यांची तमा न बाळगता हे तरुण दररोज सकाळी माथेरान या ठिकाणी येत असतात.माथेरानची शान असलेले हे रग्बी हॉटेल मालक महेंद्र ठक्कर यांनी रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीजला विकले होते.सर्वांग सुंदर असे हे हॉटेल आता केवळ रिलायन्स ग्रुपच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशिवाय कोणालाही राहण्यास दिले जात नाही.ठक्कर यांच्याकडून हॉटेल विकत घेतल्यानंतर 10 वर्षांपूर्वी रिलायन्स ग्रुपच्या संचालिका नीता अंबानी यांच्याबाबत प्रकार घडल्यानंतर हे हॉटेल काही वर्षे बंदच होते.केवळ तेथे काम करणारे कामगार हे तेथील स्वच्छता राखण्याचे काम करीत होते.वर्षानुवर्षे माथेरानच्या डोंगरातील आदिवासी लोक त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करीत आहेत.आता हॉटेल मध्ये कंपनीचे अधिकारी यांचा राबता असतो,परंतु त्या आधी तेथे कोणाचाही राबता नव्हता,पण आदिवासी वाडीमधून जाणारे कामगार यांचे कामावर जाणे कायम होते.   


                 आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मिळेल ते काम करणारे हे कामगार किमान दहा वर्षे इमानेइतबारे नोकरी करीत होते.लॉक डाऊन काळात या सर्व कामगारांना हॉटेलमध्ये काही काम नसल्याने आणि संचारबंदी असल्याने घरी राहण्यास सांगितले.आता अन लॉक मध्ये हे सर्व कामगार पुन्हा कामावर कधी येऊ हे विचारण्यासाठी गेले असता हॉटेलचे सुपरवायजर तुकाराम बावदाणे यांनी कामगांराना तुम्हाला बोलावून घेऊ असे वारंवार सांगितले.अन लॉक नंतर दीड महिना लोटला असून रग्बी हॉटेलचे सुपरवायझर बावदाणे यांनी कामगारांना बोलावल्याशिवाय येऊ नका, तुम्हाला पगार दिला जाईल असे सांगून तेथून पिटाळून लावण्याचे काम केले आहे.जगात सर्वाधिक श्रीमंत कंपनी म्हणून नावलौकीक मिळवलेली रिलायन्स कंपनीकडून आदिवासी तरुणांचा नोकरीचा अधिकार हिरावला जात आहे. कामगारांनी या हॉटेल मध्ये आठ ते दहा वर्षे नोकरी केली आहे. परंतु हॉटेल प्रशासनाने त्यांना मागील पाच महिन्याचा पगार अद्याप दिला नाही आणि त्याशिवाय त्यांचा रोजगार देखील हिरावून घेतला आहे.दररोज हे कामगार हॉटेलच्या गेट वर जाऊन कधी कामाला येऊ अशी विचारणा करीत आहेत.त्यासाठी हे कामगार दररोज जुम्मापट्टी येथून डोंगर चढून माथेरान गावात भल्या सकाळी पोहचतात आणि हॉटेलच्या गेट वर पोहचतात.गेली सव्वा महिना त्या 25 आदिवासी तरुणांचा हाच दैनंदिन कार्यक्रम बनून गेला आहे.या कामगारांनी आपल्याला न्याय द्यावा यासाठी कर्जत तालुका आदिवासी संघटनेकडे धाव घेतली आहे.आता आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते कशाप्रकारे न्याय देतात?याकडे लक्ष लागून राहिले आहे.


                  रिलायन्स ग्रुप कंपनीचे कंपनी अफेअर ऑफिसर संतोष विचारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी वरून बोलण्याचे टाळले तर त्यांना एसएमएस करून आदिवासी तरुणांच्या कामांबाबत आणि पगाराबाबत माहिती दिली.त्या एसएमएसला देखील त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.


फोटो ओळ 


माथेरानचे रग्बी हॉटेल


त्या ठिकाणी काम करणारे आदिवासी तरुण यांचा आज रोजगार हरवला आहे