'कोविड-19 आपत्ती निर्मुलन कार्य अहवाल' चे प्रकाशन तसेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानांतर्गत युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'संपर्क अभियान' चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते संपन्न...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख


पुणे,दि.8: नेतृत्व गुण असणाऱ्या तरुणांना एकत्र करुन प्रत्येक गावात 'ग्राम युवा विकास समिती' स्थापन करावी. या समितीमार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. 


  नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर, राज्य संचालक प्रमोद हिंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक श्री.कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी व समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी


जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, युवा शक्तीचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि विधायक कार्यासाठी होणे आवश्यक आहे. ग्राम युवा विकास समिती मार्फत गावांमधील विकास योजनांना गती देता येवू शकते. याकामी नेहरु युवा केंद्राने जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग व सर्व ग्रामपंचायतींचे सहकार्य घ्यावे.


'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या टप्प्यात युवा केंद्राच्या माध्यमातून जनसंपर्क व जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना बाधित रुग्ण अधिक असणाऱ्या शहरा नजीकच्या व महामार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृतीवर युवा केंद्राने भर द्यावा. घराबाहेर पडणाऱ्या युवक व नागरिकांमुळे घरातील ज्येष्ठ व गंभीर आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबद्दल माहिती पोहोचवावी. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत होणाऱ्या कला प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये आदिवासी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचा सहभाग घ्यावा. तसेच जलजागृती व जलसंवर्धन उपक्रमासाठी पाणी फौंडेशन चे सहकार्य घेऊन हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा,असे सांगून जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थींचा सहभाग विविध शासकीय कार्यक्रमांत घेण्यासाठी नियोजन करा, असेही डॉ.देशमुख यांनी सूचित केले.


राज्य संचालक प्रमोद हिंगे म्हणाले, ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून ग्राम विकास साधण्यास मदत होईल. तसेच युवकांच्या आशा,आकांक्षा, समस्या जाणून घेणे शक्य होईल.


समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी युवा केंद्राचा वार्षिक आराखड्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.


000000