पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे, दि. 5:- पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले.
पुण्यातील विधान भवन सभागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.
बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह व सहसंचालक संकेत कुलकर्णी, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ कुणाल खेमनार, पोलीस अधिक्षक संदीप पाटील आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व खासदार शरद पवार यांनी शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधींच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय मंत्री श्री जावडेकर म्हणाले, नागरिकांमध्ये ‘कोरोना’ विषाणूची भीती कमी करण्याची गरज आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती डॅशबोर्डवर अद्ययावत करावी. कोरोनाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोई-सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचनाही केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री जावडेकर यांनी दिल्या.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दृक श्राव्यप्रणालीद्वारे बैठकीत भाग घेवून सूचना केल्या. यावेळी त्या म्हणाल्या, जम्बो कोवीड रुग्णालयातील उपचारांबाबतची माहिती नागरिकांना मिळावी, खाजगी रुग्णालयांमध्ये महापौरांनी दर आठवड्यात चार रुग्णालयाची कामकाजाची माहिती घेवून चित्रफीत सादरीकरण करावी. याचप्रमाणे खासदार आमदार यांसह एक महिन्याची मोहिम राबवावी. याचा आरोग्य सेवेला फायदा होईल. नागरिकांमध्यील अफवा, गैरसमज दूर होवून वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधांना कोरोनाच्या काळात कोणत्या यंत्रणेकडे कोणती जबाबदारी दिली आहे याबाबत माहिती द्या. कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती करा. मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची मोहिम अतिप्रभावी करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मेगाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छानणी करुन कायमस्वरुपी रिक्त पदाची भरती प्रकिया सुरु आहे. कोविडच्या अनुषंगाने तात्पुरती मनुष्यबळांची भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी टेली-एक्सरे सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. नागरिकांची आरोग्य सुविधा वेळेत मिळव्यात यासाठी 50 टक्के नवीन रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी दिली.
कोरोना रुग्णाला उपचारांती खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या देयकांचे लेखापरीक्षण करा. यामध्ये ऑक्सिजन दर, पीपीई संच इत्यांदी बाबी शासनाच्या परिपत्रकान्वये आकारणी केली आहे का ? त्यांची तपासणी करा. ऑक्सिजनच्या पुरवठ्याध्ये तुटवडा होणार नाही याबाबत विशेष लक्ष द्या. डॅशबोर्डवर नागरिकांना मार्गदर्शन मिळावे याबाबत नोंद घेवून कार्यवाही करा. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोविड-19 च्या अनुषंगाने 20 पॅकेजसाठी खासगी रुग्णालयाने मोफत उपचार करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार झालेच पाहिजे. याचे उल्लघंन करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर दंड आकारणी करा, अशा सूचना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी दिल्या.
खासदार श्री पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्यासाठी मानधन तत्वावर नियुक्ती कराव्यात अशी सूचना केली.
खासदार श्री बापट नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी तसेच रुग्णवाहिका तात्काळ होण्यासाठी उच्चस्तरीय समन्वय यंत्रणा उभी करावी अशी सूचना केली.
खासदार श्री बारणे यांनी खासगी रुग्णालयाच्या बाबत प्राप्त तक्रारीची गांर्भीयाने दखल घ्यावी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या स्थितीबाबत माहिती देण्याची सूचना केल्या.
खासदार डॉ कोल्हे यांनी ग्रामीण भागातील रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी. ॲटीजेन चाचणी केल्यानंतर केल्यानंतर लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कांतील व्यक्तींचे लगेच शोध घेवून पुढील वैद्यकीय कार्यवाही करण्याची सूचना केली.
खासदार वंदना चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालय, प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषयक चाचण्या रात्री कराव्यात. नागरिकांना डॅशबोर्डवर तसेच समाज माध्यमातून अद्ययावत माहिती देण्याच्या सूचना केल्या.
आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप मोहिते-पाटील, सिध्दार्थ शिरोळे, अशोक पवार, ॲड राहुल कुल, संजय जगताप, सुनील शेळके, अण्णा बनसोडे, महेश लांडगे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
****