चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा*                                *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


          पुणे दि.25: नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.


         उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून पुणे जिल्हयातील विकासकामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस, सैन्य दल तसेच सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी पुरविला जाईल, तथापि दोन्ही महानगरपालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच या परिसरातील सुशोभिकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात. चांदणी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात अडचण येऊ नये यासाठी सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिल्या.


        नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून यामार्गावरील मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलद गतीने पूर्ण करावीत,असे ही ते म्हणाले.


        विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.डी.चिटणीस यांनी कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.


000000