रुग्णांशी व्हिडिओ कॉलने संवादामुळे नातेवाईकांना मिळतोय दिलासा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


पुणे : जम्बो कोविड रुग्णालयातील व्हिडिओ कॉल सुविधेमुळे रुग्णांशी थेट संवाद साधून विचारपूस करता येत असल्याने नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत 200+ व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. व्हिडिओ संवाद साधताना काही रुग्णांचे नातेवाईक भावुक होतात, तर अनेकजणांच्या मनातील शंका, भीती दूर होते, ते बोलल्यावर शांत होतात. या सुविधेमुळे नातेवाईकांना दिलासा मिळत आहे.


     करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जम्बो कोविड रुग्णालयातील बेडची संख्या व यंत्रणेची क्षमता वेगाने वाढविण्यासोबतच येथे व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या होत्या. त्यानुसार ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


येथे उपचार सुरू असलेल्या करोना रुग्णांची स्थिती त्यांच्या नातेवाईकांना पाहता यावी व त्यांच्याशी बोलता यावे यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. 


टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. याद्वारे महापौर व अधिकाऱ्यांनी काही नातेवाईकांसह संबंधित रुग्णांशीही व्हिडिओ कॉलने संवाद साधला. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता यावा यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार टॅबची व्यवस्था महापालिकेने केली आहे.


आपल्यावर व्यवस्थित उपचार होत आहेत का, काळजी घेतली जाते का, येथील व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करणे अपेक्षित आहे अशी विचारपूस करताना महापौरांनी रुग्णांना धीर दिला.