पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे : जम्बो कोविड सेंटरमध्ये दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे रक्तशुद्धीकरणाची सुविधा येथे उपलब्ध झाली आहे. करोनाशिवाय इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) करोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी संबंधित उपाययोजना करण्यात येत आहेत. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून लवकर करोनाच्या संसर्गातून बरे करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे, असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
जम्बो सेंटरमधील सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्याच्या सुविधांबाबत रुग्ण समाधान व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिका स्थायी समिती व इतर प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांनी COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटरची वेळोवेळी पाहणी करून आढावा घेतला आहे. त्यांच्या सूचनांनुसार सुधारणा करण्यात येत आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.
अग्रवाल यांनी सांगितले की, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्री वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध राहतील याची दक्षता घेतली जाईल. तसेच, बेड उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी 020-25502110 या हेल्पलाईनला, तर जम्बोमधील रुग्णांची विचारपूस करण्यासाठी नातेवाईकांनी 02025502525/ 26 या हल्पेलाईन क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सहव्याधी रुग्णांना करोनासोबतच इतर आवश्यक उपचार तातडीने मिळावेत यासाठी विविध सुपरस्पेशालिटी सुविधा व तज्ञ उपलब्ध करण्यात येत आहेत. अधिकाधिक बेड कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध केलेली व्हिडिओ कॉल सुविधाही उत्कृष्ट आहे, त्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.