पुणे प्रवाह न्युज पोर्टल
करोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा;
पालकमंत्री छगन भुजबळ यांची सूचना..
नाशिक : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकात पोलिसांचादेखील समावेश करावा. प्रत्येक घराघरात जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध अथवा माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ‘कोमॉर्बीड’ रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी. सर्वेक्षणाचे काम निरंतरपणे सुरू ठेवावे. खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेवून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती दररोज संकलित करावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. करोनाच्या पार्श्वभूमीवर येवला शासकीय विश्रामगृहात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड केंद्रात रूपांतरित करावा. माझे
कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिकांची मदत घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने करोना चाचणी करावी. यासाठी खासगी डॉक्टरांनाही सूचना द्याव्यात. लोकांमधील करोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. लग्नासह इतर समारंभास नियमभंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. मोठय़ा गावांमध्ये कोविड तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. बैठकीत शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, येवल्याच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदी उपस्थित होते.