पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे,दि. 25 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या रुगणवाहिका सेवेत दाखल होत आहेत.
विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आ. चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्यासह तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हा परिषदेने संकटाच्या काळात कायम मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संकटातही रुग्णवाहिका देवून ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हयातील निवडक सरपंच उपस्थित होते.
**