राज्यात पावसाची सरासरी  अकोला आणि यवतमाळ जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



 मुंबई, पुणे : येत्या आठवडय़ात पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असून यंदाच्या मोसमात राज्यात अकोला आणि यवतमाळ वगळता सर्वत्र पावसाने सरासरी गाठली. पावसाच्या परतीच्या प्रवासासाठीपूरक असे वातावरण तयार होत असल्याने २८ सप्टेंबरपासून त्याचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार वीजांसह पाऊस कोसळला. गेल्या आठवडय़ातील पावसाने कोकणात भातशेतीचे नुकसान झाले. नाशिकमधील कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागांतही यंदा पुरेसा पाऊस पडला.  मराठवाडा आणि नगरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा पडला असून गेल्या काही दिवसांपासून मराठवाडय़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  औरंगाबाद  सांगली-कोल्हापूरमध्येही अतिरिक्त पावसामुळे धरणातून पाणी विसर्ग करणे भाग पडले. यंदा विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दिवसभरात मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे १२ मिलिमीटर, सांगलीत पाच मि.मी., कोल्हापुरात ०.४ मि.मी., नाशिक आणि साताऱ्यात प्रत्येकी ०.३ मि.मी., तर सोलापुरात दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोकणात केवळ रत्नागिरीमध्ये पाच मि.मी., मराठवाडय़ात औरंगाबादमध्ये दोन मि.मी., तर विदर्भात नागपुरात तीन मि.मी. पावसाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव आणि मालेगाव, मुंबई, अलिबाग, डहाणू, परभणी, नांदेड, बीड तर विदर्भात पावसाची नोंद करण्यात आली नाही. दिवसभरात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.१ अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक नीचांकी महाबळेश्वर येथे १६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.