लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात


पुणे दि .31 : - लाळ खुरकुत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले आहे.


 पुणे जिल्हयामध्ये एकूण 1756064 इतके पशुधन असून त्यापैकी गाय व म्हैस वर्ग पशुधन 1099344 पशुधन संख्या असून या सर्व पशुधनास दिनांक 1 सप्टेंबर 2020 ते 15.10.2020 या कालावधी दरम्यान लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे., या लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक एकूण 1031000 लस मात्रा जिल्हयास प्राप्त झालेली असून सदर लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक साधन सामुग्री जसे सिरींज, निडल्स व लस टोचणी यंत्रांचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखाना स्तरावर करण्यात आलेला आहे.


         पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या रोगाचे आर्थिक महत्व लक्षात घेऊन याबाबत संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरण करुन सन 2030 पर्यंन्त लाळ खुरकुत रोगाचे पूर्ण नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे. या रोगामुळे पशूधनाच्या उत्पादन क्षमतेमध्ये घट होऊन दूध उत्पादन मोठया प्रमाणात कमी होते. तसेच वांझपणा अशक्तपणामुळे शारीरिकदृष्टया पशुधन कमकुवत होत असते. या रोगाची लागण देशात होत असल्याकारणाने मोठया प्रमाणात मांस निर्यातीला फटका बसत आहे. हा रोग पूर्णत: नियंत्रणात आल्यास मोठया प्रमाणात मांसाची निर्यात परदेशात होऊन परदेशी चलन देशास उपलब्ध होऊ शकते.


 या रोगाचे महत्व लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व पशुपालकांनी - लाळ खुरकुत हे लसीकरण करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वे दिलेली आहे.


 


     0 0 0 0 0