पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ठाणे : भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली बेकायदा इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली आणि या भागात मदतीसाठी धावाधाव सुरू झाली. भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाने जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती देताच जेमतेम अध्र्या तासाच्या अंतराने या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचले. पाऊस नसल्यामुळे या पथकाचे काम वेगाने सुरू होईल आणि परिस्थिती लगेच आटोक्यात येईल, अशी आशा होती. मात्र, अत्यंत दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली इमारत आणि ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता यांमुळे मदत पथक वेळेवर पोहोचूनही प्रत्यक्षात बचावकार्य सुरू होण्यात बऱ्याच अडचणी आल्या. दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेल्या या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच फूट रुंदीचा रस्ताही नाही. ढिगारा उपसण्यासाठी पथकाने तातडीने जे.सी.बी. यंत्र या ठिकाणी आणले. इतर साहित्यही वेगाने पोहोचविण्यात आले. मात्र जे.सी.बी. यंत्र इमारतीपर्यंत नेताच आले नाही आणि दुपारी उशिरापर्यंत हातानेच राडारोडा उपसण्याचे काम जवानांना करावे लागले. शहरातील धामणकर नाका, अंजुर फाटा, गैबीनगर या भागात अनेक अनधिकृत इमारतींचे जाळे असून या इमारती अतिशय दाटीवाटीने उभारण्यात आल्या आहेत. शहरातील बहुतांश इमारतींची रचना अशा पद्धतीने असल्यामुळे अनेक घरांमध्ये पुरेसा प्रकाशही येत नाही. त्यामुळे तेथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दिवसाही घरातील दिवे सुरू ठेवावे लागतात. शहरातील धामणकर नाका भागातील पटेल कंपाउंड परिसरात असलेली जिलानी ही तीन मजली इमारत पहाटे तीन वाजून ४० मिनिटांनी कोसळली. या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच फूट रुंदीचा रस्ताही नाही.