जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*


पुणे, दि. 22 : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरीता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार उपस्थित होते.


 जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथील कोविड केअर सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. याठिकाणी उपलब्ध असलेल्या खाटांची क्षमता व वापर, स्राव नमुना तपासणी सुविधा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, उपचार सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच आहार व्यवस्था, औषधे व साधनसामग्री तपासणी, रिपोर्टिंग पध्दती, रुग्णवाहिका व्यवस्थापन, नोडल ऑफिसर व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.


 सणसर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये भेट देत एन्ट्री व एक्झिट पॉईंटसंदर्भात चर्चा केली. यावेळी सार्वजनिक शौचालये व स्वच्छता गृहांची व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण, सर्व्हेक्षण अहवाल, कोरोनाबाधितांची संपर्क शोध मोहीम तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांचा तपशील याविषयी माहिती घेतली.


 बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय विविध विभागप्रमुखांकडून कोरोना प्रतिबंधाबाबत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी भेट दिली व तेथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी सविस्तर माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या प्रयोगशाळेची पाहणी करून कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या. तसेच खंडोबानगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामतीचे तहसिलदार विजय पाटील, इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, इंदापूरचे गटविकास अधिकारी विजय परिट, बारामतीचे गट विकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्वास ओव्हाळ, रुई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुनिल दराडे, अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.


       पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोवीड केअर सेंटरची पाहणी त्यांनी केली.प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 00000