पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ऑलिंपिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी
पुणे :- ऑलिंपिक स्पर्धांच्या वाटचालीत भारताच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे 1920 मध्ये बेल्जियम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू प्रथम सहभागी झाले होते, त्यास आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. देशात ऑलिंपिक खेळांच्या प्रसाराची व या स्पर्धेतील सहभागाची पायाभरणी 100 वर्षांपूर्वी करण्यात उद्योग महर्षी सर दोराबजी टाटा आणि पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब यांचा मोठा वाटा होता.
पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबला त्याकाळी क्रिडा क्षेत्रात खूप महत्व होते. 1919 मध्ये त्यांनी आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभात मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉईड जॉर्ज हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष उद्योगमहर्षी सर दोराबजी टाटा यांनी -1920 मध्ये बेल्जियम मधील अँटवर्प येथे होणार्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा संघ ब्रिटीश ऑलिंपिक कमिटीमार्फत पाठवावा- अशी विनंती वजा मागणी केली. गव्हर्नर लॉईड जॉर्ज यांनी ही मागणी मान्य केली आणि फेब्रुवारी 1920 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने भारतीय संघाच्या प्रवेशास अनुमती दिली.
लगेचच म्हणजे एप्रिल 1920 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत पात्र ठरणार्या भारतीय खेळाडूंची निवड करण्यासाठी पात्रता स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. या पात्रता स्पर्धेत बंगालचे पुर्मा बॅनर्जी(स्प्रिंट्स), कर्नाटकचे फडेप्पा चौगुले(10,000मी. धावणे व मॅरेथॉन), साताराचे सदाशिव दातार(10,000मी. धावणे व मॅरेथॉन), हुबळीचे के.कैकाडी(5000 मी. व 10000 मी.धावणे), कोल्हापूरचे एम.शिंदे(कुस्ती), मुंबईचे जी.नवले(कुस्ती) या खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यांच्या सोबत सोहरब एच.बूत हे मॅनेजर आणि डॉ.ए.एच.फैजी हे वैद्यकिय अधिकारी व सल्लागार यांची निवड करण्यात आली. या टीमच्या खर्चासाठी सर दोराबजी टाटा यांनी 8 हजार रुपये, भारत सरकारने 6 हजार रुपये आणि मुंबईतील क्रीडाप्रेमींनी 7 हजार रुपये असे दिले गेले. ही टीम मुंबईहून 5 जून 1920 रोजी एस.एस.मंतूआ या जहाजाने लंडनकडे रवाना झाली. लंडनमधील स्टॅम्फोर्ड ब्रिज स्टेडियम येथे इंग्लिश प्रशिक्षक एच. पॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली या टिमचे सहा आठवडे ट्रेनिंग झाले आणि त्यानंतर ही टीम बेल्जियमच्या अँटवर्प ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत कर्नाटकच्या पी.डी.चौगुले यांनी मॅरेथॉन स्पर्धेत आणि कोल्हापूरच्या एस.शिंदे यांनी कुस्तीमध्ये विशेष चमक दाखवली.
भारतीय खेळाडूंच ऑलिंपिक मध्ये हा प्रथम सहभाग होता.