दर्जेदार सुविधांनी युक्त स्व. नानाजी देशमुख रुग्णालय लवकरच उभारणार - पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांची माहिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे :-  कोरोनाग्रस्तांकरीता उभारण्यात येणा-या जंबो हॉस्पिटलबाबतची जबाबदारी पुणे मनपा सर्वतोपरी पार पाडणार


 


पुणे : दर्जेदार सुविधांनी युक्त असलेले सर्वसमान्य पुणेकरांसाठीचे सुमारे १ हजार खाटांचे स्व. नानाजी देशमुख रुग्णालय लवकरच उभारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून कर्जस्वरुपात निधी उपलब्ध करुन लवकरच हे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होईल. जंबो हॉस्पिटलबाबत असलेली जबाबदारी पुणे मनपा सर्वतोपरी पार पाडेल, असे सांगत शहरात गेले ४ महिने महापालिकेकडून सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी काम केले जात असून मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी विनंती पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे.  


 


ते पुढे म्हणाले, शहरात गेले ४ महिने महापालिकेकडून सातत्याने कोरोना नियंत्रणासाठी काम केले जात असून त्यावर आत्तापर्यंत २५० ते ३०० कोटींचा खर्च झाला आहे. पुण्यामध्ये आॅगस्ट महिन्यात कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा २ लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गंभीर कोरोनाग्रस्त रूग्णांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात आॅक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नाही. जंबो हॉस्पीटल हे पुणेकरांसाठीच असल्याने त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करणार असून आवश्यक निधी स्थायी समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 


 


पुणे महापालिकेने आधीच शहरातील करोनाग्रस्तांसाठी अडीचशे कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे पालिकेस ही साथ आटोक्यात येईपर्यंत आणखी खर्च करावा लागणार आहे. त्यातच, लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्नही घटलेले आहे. शहरातील कोरोना नियंत्रनचा कोणताही खर्च पालिकेने थांबविलेला नाही तसेच थांबवणारही नाही. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि कोरोना नियंत्रणाचे काम पाहता राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करावे, असेही त्यांनी सांगितले. 


तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.


              नगरसेवक हेमंत रासने - (अध्यक्ष, स्थायी समिती पुणे