*सर्व सामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने धर्मादाय आणि खाजगी रुग्णालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करावी...* *आमदार लक्ष्मण जगताप*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पिंपरी, दि. २८ पुणे प्रवाह (प्रतिनिधी)*– राज्यातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्यादृष्टीने सर्व धर्मादाय तसेच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ई-मेल केलेल्या पत्रात म्हटले आहे, “सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य याजोना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या योजना पुण्यातील काही नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्ण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे.


 


या योजनांचा सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा यासाठी सरकारने व्यापक विचार करण्याची गरज आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालये सार्वजनिक न्यासामार्फत चालविल्या जातात. गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे या रुग्णालयांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व धर्मादाय तसेच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याची सक्ती करावी. त्यामुळे मोठे आणि गंभीर आजार झालेल्या गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.


 


तसे झाल्यास राज्यातील कोणताही गरीब रुग्ण पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहणार नाही. सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या हिताचा विचार करता राज्य सरकारने त्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. दोन्ही योजना तातडीने सक्तीने लागू करण्याबाबत संबंधित विभागांना योग्य कार्यवाहीचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.