श्री गुरुदेव दत्त साकारल्यानंतर आता मंदार जाधव दिसणार नव्या रुपात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  


स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मंदार साकारणार जयदीप ही व्यक्तिरेखा


 


स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त मालिकेत श्री दत्तांची भूमिका साकारलेला अभिनेता मंदार जाधव आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही नवी मालिका लवकरच भेटीला येणार आहे. या मालिकेत तो जयदिप यशवंत शिर्के पाटील ही प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. श्री गुरुदेव दत्त मालिकेतल्या मंदारच्या लूकचं खूपच कौतुक झालं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील त्याचा लूकही लक्षवेधी असणार आहे. या लूकसाठी मंदार बरीच मेहनत घेतोय. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत त्याने त्याच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतली आहे.


 


सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, श्री गुरुदेव दत्त नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची मालिका करतोय याचा प्रचंड आनंद आहे. कोल्हापूरात घडणारी ही गोष्ट आहे. जयदीप असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव असून तो परदेशात शिकलेला मुलगा आहे. जयदीप अन्यायाविरोधात नेहमी उभा ठाकतो आणि हेच त्याचं वेगळेपण आहे. आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई याचं उत्तम उदाहरण म्हणून जयदीप या पात्राचा उल्लेख करता येईल. श्री दत्तांच्या रुपात प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं त्यामुळे नव्या मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.