*डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


             पुणे दि. 23 :- कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेवून आयसीयू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केले.


 


            विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ससून हॉस्पिटलचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.


 


            विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी सुरुवातीला पुणे शहरातील कोरोना परिस्थतीच्या अनुषंगाने देश व राज्य पातळीवरील तुलनात्मक तक्ता, वाढत जाणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, त्यादृष्टीने खासगी रुग्णालयातील उपलब्ध आयसीयू तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटांची संख्या, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण, मृत्यूदर, रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळ इत्यादी बाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  


 


टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ केल्यामुळे कोराना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णांप्रती पर्यायाने शहराप्रती आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व लक्षात घेवून प्रत्येक रुग्ण कोरोना मुक्त कसा बरा होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णालयात येणारे प्रत्येक व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आहे असे समजूनच त्यावर उपचार करावे. खासगी रुग्णालयांनी कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारांती देण्यात येणाऱ्या अवाजवी वैद्यकीय देयकावर नियत्रंण आणावे, रुग्णालयातील उपलब्ध खाटा गरजू रुग्णांना देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. सहव्याधी रुग्णांवर प्राधान्याने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. रुग्णालयातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही विशेष कार्य अधिकारी श्री. राव यांनी दिल्या.


 


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाच्या संकटकाळात पुणे शहरासह जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम होत आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर इतर शहराच्या तुलनेत बरा आहे. टाळेबंदीच्या काळात कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ केल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. त्यामुळे वाढत जाणारी रुग्णसंख्या लक्षात घेवूनच ग्रामीण भागात आयसीयू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांला वेळेत औषधोपचार देण्यावर भर द्यावा, रुग्णालयात औषधाचा साठा कमी पडणार नाही, याबाबत विशेष काळजी घ्यावी, अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थितीबाबत वस्तूनिष्ठ माहिती द्यावी, जेणेकरुन ते रुग्णावर चालू असलेल्या उपचाराबाबत समाधानी राहतील, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिल्या.


 


पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ८०० खाटा नव्याने उपलब्ध करण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये २०० आयसीयू आणि ६०० ऑक्सिजनयुक्त खाटांचा समावेश असणार आहे. कोरोनाविरुध्दच्यालढाईत पुण्यातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था, खासगी व्यक्ती यांचे सहकार्य महानगरपालिका घेणार आहे. त्यांना परिस्थितीनुसार योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे. शहरातील जनरल प्रॅक्टिशनर्सना कोरोना संशयित किंवा सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी महानगरपालिकेने दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत खासगी रुग्णालय चांगले सहकार्य करीत असून यापुढे असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.


 


पुण्यातील खाजगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रमुख डॉक्टर उपस्थितांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.


Popular posts
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
Shri Sharad Pawar on his 80 Birth-day at his residence Silver Oaks in Mumbai. To personally give the news of an award from U.S.A on the occasion of his Birth-day celebrations
आनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या
Image