१५ आघाडीच्या निर्मात्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


आज दिनांक २० जुलै २०२० रोजी


जाहीर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की


मराठी नाट्यसृष्टीतील आघाडीच्या १५ निर्मात्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली आहे. सदरहू संघटनेचे नाव, कार्यकारिणी आणि उद्दिष्टे आम्ही आपणांस सादर करीत आहोत. आजच्या या वेबसंवादात करमणूक क्षेत्रातील पुष्कर श्रोत्री, कविता लाड-मेढेकर, अतुल परचुरे, निवेदिता सराफ, अवधूत गुप्ते, प्रसाद ओक, सचित पाटील, तेजश्री प्रधान, संतोष जुवेकर, सुयश टिळक, संकर्षण कऱ्हाडे, पुरुषोत्तम बेर्डे, राजेश देशपांडे व इतर अनेक मान्यवर कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते. निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या. राज्यातील विविध शहरांतील अनेक पत्रकार मंडळीनी यात सहभाग घेतला.


नाव : ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ’  


सन्माननीय सल्लागार


लता नार्वेकर


प्रशांत दामले


अध्यक्ष: अमेय खोपकर


उपाध्यक्ष: महेश मांजरेकर


कार्यवाह: दिलीप जाधव


सहकार्यवाह: श्रीपाद पद्माकर


कोषाध्यक्ष: चंद्रकांत लोकरे


प्रवक्ता : अनंत पणशीकर


कार्यकारिणी सदस्य: सुनील बर्वे, नंदू कदम


 


उद्दिष्ट आणि कार्य -


१) चांगली आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत संघातील निर्मात्यांना पाठिंबा देणे.


 


२) नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे.


 


३) नाटक मुंबई-पुणे पुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र, इतर राज्यात व देशाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी प्रयत्नशील राहाणे.


 


४) महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या अवस्थेविषयी आढावा घेऊन सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे.


 


५) प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे.


 


६) नाटकांची प्रसिद्धी करण्यासाठी वर्तमानपत्रांसोबतच इतर माध्यमं उपलब्ध करून देणे.


 


७) नाटक, OTT platform शी संलग्न करून देण्यासाठी प्रयत्न करणे.


 


८) नाटक व्यवसायाचे ४ प्रमुख घटक = निर्माता, कलाकार, बॅकस्टेज आणि प्रेक्षक आहेत. या सर्वांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार.


 


९) नाट्यगृहांचे व्यवस्थापन आणि देखभाल संबंधी विचार आणि कृती आराखडा तयार करणे.


 


१०) या संघात सभासदांची खोगीर भरती होणार नसून जे सातत्याने कार्यरत आहेत व पुढेही राहणार आहेत अशा निर्मात्यांनाच सभासदत्व देण्यात येईल.


 


११) संघाचे संस्थापक सदस्य हे आघाडीचे निर्माते आहेतच त्याशिवाय भारत आणि भारताबाहेर, परदेशात देखील सातत्याने प्रयोगशील असणाऱ्या निर्मात्यांसोबत कार्य करणे.


नाटक मोठं करण्याच्या दृष्टीने आणि नाट्यव्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने ह्या नवीन निर्माता संघाची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच निर्माता संघाचा दृष्टिकोन आणि सविस्तर योजनांची माहिती आपल्याला कळवण्यात येईल असं प्रवक्ते श्री. अनंत पणशीकर ह्यांनी सांगितले. ‘जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ’ असे ह्या संघाचे नाव असल्याने नाटक करणारे सर्वच म्हणजे व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक, समांतर सर्वांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी प्रयत्नशील राहील तसेच दुसऱ्यांची रेष न पुसता आपली स्वतःची रेष मोठी करण्यातच आनंद वाटेल असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमेय खोपकर ह्यांनी या प्रसंगी केले.


धन्यवाद,


अध्यक्ष कार्यवाह


अमेय खोपकर दिलीप जाधव