पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे शहराच्या आधुनिक इतिहासात १२ जुलै १९६१ हा दिवस भीषण काळरात्र ठरला. त्या दिवशी पानशेत धरण फुटले. संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. एकूण ७५० घरे उद्ध्वस्त झाली. तब्बल २६ हजार कुटुंबांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली. दहा हजार कुटुंबे बेघर झाली. सुमारे सोळा हजार दुकानांतील वस्तूंचे साठे नष्ट झाले. केंद्र, राज्य सरकार, अनेक खासगी व सार्वजनिक संस्था, प्रसिद्ध ग्रंथालये, सरकारी व खासगी गोदामांमधील धान्यसाठे, ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रे, दूरध्वनी आणि पिण्याच्या व सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, उद्याने आदींची त्या वेळी अपरिमित हानी झाली. अंगावरील वस्त्रानिशी आणि हयातभरची पुंजी महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या करूण कहाण्या ऐकताच ताबडतोब देशाच्या कानाकोपऱ्यांतून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ पानशेत पूरग्रस्तांसाठी पुण्यात जमा होऊ लागला. राज्य सरकारने तातडीने विविध सरकारी विभाग आणि लष्कराची मदत घेऊन आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले. दत्तवाडी, सेनादत्त (राजेंद्रनगर), पर्वतीदर्शन, शिवदर्शन, एरंडवन, हेल्थ कॅम्प, जनवाडी, गोखलेनगर, भवानी पेठ आदी भागांमध्ये त्यांच्यासाठी युद्धपातळीवर ओटे, निसेन हट, शेणघरे, गोलघरे अशा नावांचे एकूण तीन हजार ९८८ निवासी गाळे पूरग्रस्त कुटुंबांना सरकारतर्फे उपलब्ध झाले.