सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित SPPU NSS व्हर्च्युअल वारी मध्ये १लाख २४ हजारांहून जास्त फळझाडांची लागवड* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 



 


वृक्षारोपणाने SPPU NSS २०२० व्हर्च्युअल वारीचा समारोप


 


पुणे - दि.०७ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फे आयोजित 'स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी' SPPU NSS वारीचा ऑनलाईन समारोपाचा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक ७ जुलै २०२० रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला.   


 


 या कार्यक्रमासाठी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री, राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे,अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर तसेच विद्यार्थी विकास मंडळ विभागाचे संचालक डॉ. संतोष परचुरे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. 


समारोपाच्या कार्यक्रमानंतर कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 


 


 कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, कोविडच्या काळात पुणे विद्यापीठाने अनेक चांगले उपक्रम केले आहेत, यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा मोठा पुढाकार आहे. या व्हर्च्युअल वारी दरम्यान जी झाडे विद्यार्थ्यांनी लावली आहेत, त्यांची भौगोलिक आरेखनाद्वारे विद्यार्थी वर्षभर काळजी घेणार आहेत. ही झाडे लावल्यामुळे एक प्रकारे नैसर्गिक ऑक्सिजन हब आपण तयार केले आहेत. कोरोना नंतरच्या पुढील काळात हे ऑक्सिजन हब संपूर्ण समाजाला उपयोगाला येणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक तयार करणे, हीच आपली प्रेरणा असते आणि त्याच दृष्टीकोनातून विद्यापीठ नेहमीच काम करत आले आहे. 


 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डाॅ. प्रभाकर देसाई म्हणाले, टाळेबंदीमुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत जाता येत नसले तरी आपल्या राहत्या घराजवळ, वस्तीत, गावात, शहरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता, रक्तदान, आरोग्य सर्वेक्षण, परिसर स्वच्छताजागृती प्रबोधन आणि उद्बोधन अशा उपक्रमांच्या माध्यमातून यंदाच्या या व्हर्च्युअल वारीत सहभाग नोंदवला आहे.   


 


 यानंतर प्राचार्य डाॅ. संजय चाकणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, या व्हर्च्युअल वारी मध्ये लावलेल्या झाडांचे विद्यार्थ्यांनी वर्षभर संगोपन करावे. वारीमध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक यांचे त्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आणखीन झाडे लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. चाकणे यांनी या माध्यमातून केले. 


 


व्यवस्थापन परिषद सदस्य मा. श्री. राजेश पांडे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यापीठाचे एक संघटन आहे. विद्यार्थी हे या संघटनाची शक्ती आहेत. विद्यार्थ्यांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार यापूर्वी विविध उपक्रमातून सर्वानी अनुभवला आहे. या व्हर्च्युअल वारीमध्ये ५६० महाविद्यालयांच्या ७८ हजार ६९० विद्यार्थ्यांनी १ लाख २४ हजार ६०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून देशासाठी आपण एक प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार करत आहोत." या मोठ्या सामूहिक अविष्काराबद्दल सर्व विद्यार्थी स्वयंसेवक आणि प्राध्यापकांचे राजेश पांडे यांनी अभिनंदन केले. 


 


कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले,या कोरोनाच्या काळामध्ये सर्व मरगळ झटकून टाकत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पूर्ण क्षमतेने काम केले आहे. व्हर्च्युअल वारी आणि त्यापूर्वी गेले तीन महिने NSS च्या सर्व स्वयंसेवकांनी एक अद्वितीय प्रकारचे उदाहरण संपूर्ण देशासमोर प्रस्तुत केले आहे. 


 


यानंतर अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर म्हणाल्या, "राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी गेल्या तीन महिन्यात जे काम केले आहे, याचं वर्णन मी 'समाजासाठी अविरत सेवा' या शब्दांत करेन. यंदाच्या व्हर्च्युअल वारी मध्ये आपण १ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला होता, विद्यार्थ्यांनी सव्वा लाख झाडे लावून या उपक्रमाला जो प्रतिसाद दिला आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते." 


 


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, व्हर्च्युअल वारीसह गेले तीन महिने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जे समाजपयोगी असे काम केले आहे, त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना 


विभागाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. 


 


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संतोष परचुरे यांनी केले तर सूत्रसंचलन स्वामिराज भिसे यांनी केले. 


 


हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या फेसबुक पेजवर पाहता येईल. 


फेसबुक पेजची लिंक : https://www.facebook.com/sppunss/