जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा १२वीचा निकाल शंभर टक्के - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ची जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


   


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 


 


योजनेतंर्गत बीएमसीसी महाविद्यालयामध्ये शिकणारी आरती कल्याणी व आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधील गौरी खटावकर या ८८.४६% गुण मिळवून प्रथम आल्या आहेत. तसेच निकिता जलनीला या बीएमसीसीमधील विद्यार्थीनीला ८५.५३% गुण मिळाले आहेत. योजनेतील तीन विद्यार्थ्यांनी ८०% च्या पुढे गुण मिळवले असून ६०% च्या पुढे सहा विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आहेत. योजनेतील एकूण १३ विद्यार्थी यंदा १२ वी च्या परीक्षेला बसले होते. त्यातील सात वाणिज्य शाखेचे, पाच विज्ञान शाखेचे आणि एक नर्सिंगची विद्यार्थिनी होती. 


 


ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. आरती आणि निकिताला वडील नसून आरतीची आई विडी कामगार आहे, तर निकिताची आई घरकाम करते. तर गौरीचे वडील शिंपी काम करतात. ट्रस्टतर्फे सर्व विश्वस्तांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देखील केले आहे. मानवसेवेचे मंदिर उभारताना विद्यार्थी शिक्षणाच्या दृष्टीने देखील ट्रस्ट सातत्याने कार्यरत आहे. 


 


विद्यार्थीनी आरती कल्याणी म्हणाली, रेणुका स्वरुप शाळेमध्ये इयत्ता २ री मध्ये असताना मी ट्रस्टच्या योजनेमध्ये सहभागी झाले. वडिल नाहीत आणि आई विडी कामगार असल्याने मला ट्रस्टचा मिळालेला मदतीचा हात खूप मोलाचा ठरला. पुढे मला सीए व्हायचे आहे. त्याकरीता ट्रस्टने माझा सर्व खर्च उचलला आहे. आजपर्यंत शाळा, महाविद्यालयाच्या फी साठी सहकार्य ट्रस्टनेच केले आहे. आता सीए परीक्षेची माझी तयारी झाली असून नोव्हेंबरमध्ये परीक्षा देणार आहे.


 


* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यातील यशस्वी विद्यार्थी.