कर्जत तालुक्यातील राजकारणी मंडळींच्या घरात कोरोना चा शिरकाव... कर्जत,ता.14 गणेश पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


कर्जत तालुक्यातील राजकारणी मंडळींच्या घरात कोरोना चा शिरकाव...


कर्जत,ता.14 गणेश पवार


               कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अडीचशेचा आकडा पार केला आहे.शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना कोरोना ने ग्रासले आहे.त्यात श्रीमंत पासून गरीब सर्व जण कोरोनाने बाधित झालेले असताना दोन राजकीय पक्षांचे प्रमुख आणि अनेक लोकप्रतिनिधी यांच्या घरापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान,ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कोरोना चा शिरकाव झालेला असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व दैनंदिन व्यवहार कोणत्याही प्रकारची बंधने न घेता लॉक डाऊन न करता मुक्तपणे सुरू आहेत.


               22 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु केला होता.त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारने तब्बल तीनवेळा लॉक डाऊन घेतला आहे.त्यामुळे तीन महिने लॉक डाऊन मध्ये राहिलेले सर्व जण आता अनलॉक मध्ये मुक्त संचार करीत आहेत.20 एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नेरळ येथे आढळून आल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीचशेचा टप्पा पार करील असे कोणालाही वाटले नव्हते.त्यात कर्जत शहर आणि आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसर तसेच नेरळ या शहरी भाग बनत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये एकूण रुग्णांपैकी अर्धे रुग्ण आढळले आहेत.त्याचवेळी कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात कोरोना चे रुग्ण आढळून येत आहेत.त्यात कर्जत शहरापासून 30-35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात देखील कोरोना पोहचला आहे.ही बाब कर्जत सारख्या ग्रामीण आणि आदिवासी भाग असलेल्या तालुक्यातील जनतेला विचार करायला लावणारी आहे. कर्जत तालुक्यात आज 100 गावात कोरोनाचा रुग्ण आढळला असून दररोज सापडणारे रुग्ण आणि त्यानंतर सील केला जाणारा परिसर हे समीकरण बदलून गेले आहे.बाधित क्षेत्राची व्याख्या बदलली असल्याने कर्जत तालुक्यात आता दररोज दोन आकडी संख्येत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे जनतेने स्वतः कर्फ्यु घ्यावा असे चित्र जुलै महिन्याचे सुरुवातीला तयार झाले होते.परंतु कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत त्यात होत नाही आणि म्हणून कर्जत तालुक्यात लॉक डाऊन झाला नाही आणि त्यामुळे कदाचित कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दररोज आढळून येत असल्याचे बोलले जात आहे.


                  कोरोनाचा विषाणू हा गरीब श्रीमंत आणि जाती धर्म याचा विचार करीत नाही.त्यात मोठ्या राजकीय व्यक्तीच्या घरात हा पोहचला असून माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन पुतणे हे कोरोना बाधित झाले होते.त्याआधी शेलु ग्रामपंचायतचे सदस्य आणि माजी उपसरपंच राहिलेला तरुण, ममदापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच,नेरळ गावातील तीन खासगी डॉक्टर तसेच त्यांचे कुटुंबीय,नेरळ मधील आरपीआयचे माजी अध्यक्ष, कर्जत शहरातील एक माजी स्वीकृत नगरसेवक,यांना तसेच दीड महिन्याचे बाळापासून 87 वर्षाच्या वयोवृद्ध यांच्यापर्यंत अनेकांना कोरोना ने आपल्या कक्षेत घेतले आहे.त्यातून राजकीय नेत्यांची कुटुंबे यांना कोरोनाने ग्रासले आहे.त्यात शिवसेनेचे कर्जत शहरातील एक उप शहरप्रमुख,वावलोली ग्रामपंचायतचे उपसरपंच यांना देखील कोरोना झाला आहे.नेरळ ग्रामपंचायत एक माजी सदस्य,यांच्यापर्यंत पोहचलेला कोरोना शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे चिंचवली येथे राहणारे युवकाला कोरोना झाला होता.विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे भाऊ हे त्यांच्याकडे फार्म हाऊसवर असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह कामगारांच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरण व्हावे लागले होते.तर विद्यमान आमदारांच्या कार्यालयातील अन्य एका तरुणाला देखील कोरोना झाला आहे.


                 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट तयार करून आपल्यासह आपला मुलगा,एक स्नुषा यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आपल्या कुटुंबाच्या संपर्कात कोणी येऊ नये असे आवाहन केले होते.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष यांच्या जवळ पोहचलेला कोरोना हा शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस यांच्या पर्यंत जाऊन आहे.त्यात त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलं ही देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली आहेत. त्यामुळे कोरोना हा राजकीय पक्ष किंवा गरीब-श्रीमंत असा भेदभाव ठेवत नाही.त्यामुळे कर्जत तालुक्यात दररोज मिळणारे कोरोनाने रुग्ण यांची संख्या लक्षात घेता कठोर पावले प्रशासनाकडून उचलणे गरजेचे आहे.लॉक डाऊन आणि जनता कर्फ्यु साठी कर्जत तालुक्यातील काही राजकीय पक्ष तयार नाहीत हे सर्वपक्षीय बैठकीत दिसून आले आहे.त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोखण्यासाठी जनता कसे सामोरे जाणार याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.